IND vs AUS Final : समांतर…! असं मी कुठेतरी पाहिलं आहे, फायनलला झालेल्या स्कोअरवरून सोशल मीडियावर चर्चा
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेचा अंतिम सामना सुरु आहे. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत सर्वबाद 240 धावा केल्या आणि विजयासाठी 241 धावांचं आव्हान दिलं आहे. पण असाच काहीसा सामना 2019 वनडे वर्ल्डकपमध्ये झाला होता.
मुंबई : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील अंतिम सामना सुरु आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी स्वीकारली. भारताने प्रथम फलंदाजी करताना हव्या तितक्या धावा केल्या नाहीत. भारताने 50 षटकात सर्वबाद 240 धावा केल्या. यामुळे भारतीय क्रीडाप्रेमींची धाकधूक वाढली आहे. संपूर्ण स्पर्धेत टीम इंडियाने चांगली कामगिरी आणि अंतिम सामन्यातील अशी खेळी पाहून क्रीडाप्रेमींचं टेन्शन वाढलं आहे. पण असं असताना दुसरीकडे 2019 वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम फेरीची चर्चा रंगली आहे. न्यूझीलंडने 8 गडी गमवून 241 धावा केल्या होत्या आणि 242 धावा विजयासाठी दिल्या होत्या. पण इंग्लंडचा संघ सर्वबाद 241 धावा करू शकला. त्यामुळे हा सामना सुपर ओव्हरमध्ये गेला. सुपर ओव्हरमध्येही सामना टाय झाला. त्यानंतर चौकारांच्या आधारावर इंग्लंडला विजयी घोषित करण्यात आलं. आता तसंच काहीसं दिसत आहे.
भारताने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात सर्वबाद 240 धावा केल्या आणि विजयासाठी 241 धावांचं आव्हान दिलं आहे. आता हे आव्हान रोखण्यासाठी भारतीय गोलंदाजाची कठीण परीक्षा असणार आहे. मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा यांच्यावर जबाबदारी असणार आहे. प्रत्येक धाव महत्त्वाची असल्याने क्षेत्ररक्षणही तितकंच महत्त्वाचं असणार आहे. त्यामुळे पुढच्या 50 षटकात कशी खेळी असेल याकडे लक्ष लागून आहे.
ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत पाचवेळा वनडे वर्ल्डकप जिंकला आहे. तर भारतीय संघाने दोन वेळा जेतेपद जिंकलं असून तिसऱ्यांदा जेतेपद जिंकण्याची संधी आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडिया आता हा कारनामा करते का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज
ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): ट्रॅव्हिस हेड, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ, मार्नस लॅबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, जोश इंग्लिस (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स (कर्णधार), अॅडम झाम्पा, जोश हेझलवूड