IND vs ENG : टॉम हार्टलेच्या विकेटवरून अश्विनसह रोहित शर्मा पंचांशी भिडला, अम्पायर कॉलनंतरही नॉट आऊट दिल्याने विचारला जाब
इंग्लंड विरुद्धचा दुसरा कसोटी सामना भारताने 106 धावांनी जिंकला. या विजयानंतर मालिकेत 1-1 ने बरोबरी झाली आहे. पण हा विजय काही सोपा नव्हता. दुसऱ्या डावात प्रत्येक विकेट महत्वाची होती. तळाशी झुंज देत असलेला टॉम हार्टले जाळ्यात अडकला होता. पण आऊट असूनही त्याला नाबाद देण्यात आलं.
मुंबई : भारत इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील दुसरा सामना जिंकत टीम इंडियाने मालिकेत 1-1 बरोबरी साधली आहे. भारताने इंग्लंडसमोर विजयासाठी 398 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. पण इंग्लंडचा संघ सर्वबाद 292 धावा करू शकला आणि 106 धावांनी विजय मिळवला. दुसऱ्या डावात तळाशी आलेल्या टॉम हार्टलेने चिवट खेळीचं दर्शन घडवलं. टीम इंडियाला विजयासाठी प्रत्येक विकेट महत्त्वाची होती. त्यासाठी प्रयत्न सुरु होते. टॉम हार्टलेला बाद करण्यात यशही मिळालं होतं. पंचांनी त्याला बाद घोषित केल्यानंतर त्याने डीआरएस घेतला आणि त्यातही आऊट असल्याचं दिसून आलं. तरीही फिल्डवरील पंचांनी त्याला नाबाद घोषित केलं. त्यामुळे मैदानात उपस्थित असलेल्या खेळाडूंना आश्चर्याचा धक्का बसला. फिल्डवरच्या पंचांनी बाद दिलं असून अंम्पायर कॉलच्या विरोधात कसा काय निर्णय दिला. यावरून आर. अश्विन आणि रोहित शर्मा यांनी पंचांशी वाद घातला आणि खरं काय ते कारण समोर आलं.
दुसऱ्या डावात इंग्लंडचे सात गडी बाद झाले होते. दुसऱ्या डावातील 63 वं षटक आर अश्विन टाकत होता. त्यात टॉम हार्टलेला टाकलेल्या एका चेंडूवर जोरदार अपील केली आणि पंचांनी बाद दिलं. कॅचसाठी अपील करण्यात आली होती. पंचांनी बाद दिल्यानंतर टॉमने रिव्ह्यू घेतला. त्यात चेंडू ग्लोव्ह्जला नाही तर पॅडला लागला होता. त्यानंतर एलबीडब्ल्यू चेक करण्यात आला. त्यातही बाद असल्याचं दिसून आलं. पण पंचांनी नाबाद असल्याचं घोषित केलं. त्यानंतर रोहित शर्मासह भारतीय खेळाडूंनी पंचांना जाब विचारला.
इंग्लंडच्या 62.4 षटकात 7 गडी गमवून 268 धावा झाल्या होत्या. विजयासाठी 131 धावा हव्या होत्या. टॉम हार्टले 28 आणि बेन फोक्स 31 धावांवर होते. अपील करण्यात आली तेव्हा कॅच आऊट म्हणून निर्णय देण्यात आला होता. पंचांनी एलबीडब्ल्यूसाठी बाद दिला नव्हता. त्यामुळे अंपायर कॉल असूनही हार्टले वाचला. कारण कळताच रोहित शर्मा आणि इतर खेळाडू थंड झाले आणि पुढचा खेळ सुरु झाला. शेवटी हार्टलेला जसप्रीत बुमराहने क्लिन बोल्ड करत सामना जिंकवला. विजयामुळे टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत जबरदस्त फायदा झाला आहे.