IND vs NZ : दुसऱ्या कसोटीपूर्वी झालेल्या वादावर ‘सुंदर’ तोडगा, झालं असं की…
भारत न्यूझीलंड दुसऱ्या कसोटीचा पहिला दिवस संपला आहे. पहिल्या दिवसावर वॉशिंग्टन सुंदरने राज्य गाजवलं. न्यूझीलंडचे सात विकेट घेत पहिल्या डावावर टीम इंडियाला पकड मिळवून दिली आहे. पण या सामन्यापूर्वी कर्णधार रोहित शर्मा टीकेचा धनी ठरला होता.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात वॉशिंग्टन सुंदर हुकूमचा एक्का ठरला आहे. दुसऱ्या कसोटीपूर्वी संघात वॉशिंग्टन सुंदरचा समावेश करण्यात आला होता. त्यानंतर प्रशिक्षक गौतम गंभीर आणि कर्णधार रोहित शर्मा यांनी मोठा डाव खेळत त्याला प्लेइंग 11 मध्ये घेतलं. तीन वर्षानंतर वॉशिंग्टन सुंदरचं संघात पदार्पण झालं होतं. त्यामुळे वॉशिंग्टन सुंदरच्या निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात होतं. वॉशिंग्टन सुंदरला कुलदीप यादवच्या जागी स्थान मिळालं होतं. त्यामुळे माजी क्रिकेटपटू सुनिल गावस्कर यांनी हा निर्णय चुकीचा असल्याचं सांगितलं होतं. सुनिल गावस्कर यांच्या मते कुलदीप यादवलाच प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळायला हवं होतं. पण वॉशिंग्टन सुंदरने कामगिरीने हा निर्णय चुकीचा ठरवला आहे. वॉशिंग्टन सुंदरने आपल्या गोलंदाजीच्या जोरावर न्यूझीलंडला 259 धावांवर चीतपट केलं. वॉशिंग्टन व्यतिरिक्त आर अश्विनने तीन विकेट घेतल्या.
वॉशिंग्टन सुंदरने रोहित शर्मा आणि प्रशिक्षक गौतम गंभीरचा निर्णय योग्य असल्याचं सांगितलं आहे. किवी फलंदाजांना वॉशिंग्टन सुंदरने अडचणीत आणलं. न्यूझीलंडच्या मधल्या फळीच्या फलंदाजांना बाद करण्याचं मोठं काम केलं. वॉशिंग्टन सुंदरने 7 विकेट घेतल्या. वॉशिंग्टन सुंदरने कसोटीच्या एका डावात 5 पेक्षा जास्त विकेट घेण्याचा कारनामा पहिल्यांदाच केला आहे. यावेळी त्याने न्यूझीलंडच्या मोठमोठ्या खेळाडूंना तंबूचा रस्ता दाखवला. वॉशिंग्टन सुंदरने पहिलीच विकेट रचिन रवींद्रची घेतली. त्यानंतर टॉम ब्लंडल, डेरिल मिचेल, ग्लेन फिलिप्स, टिम साउथी, एजाज पटेल आणि मिचेल सँटनरला बाद केलं.
वॉशिंग्टन सुंदरने यापूर्वी टीम इंडियासाठी 4 सामन्यात 6 विकेट घेतल्या होत्या. पण न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी त्याने चांगली कामगिरी केली. एकाच डावात 7 गडी बाद केले. इतकंच काय तर पाच विकेट त्याने क्लिन बोल्ड केले हे विशेष आहे. वॉशिंग्टन सुंदरच्या कसोटी क्रिकेटमधील हा सर्वात बेस्ट स्पेल आहे. दरम्यान, न्यूझीलंडचा संपू्र्ण संघ 259 धावांवर बाद झाला. तर भारताची सुरुवात मात्र निराशाजनक झाली आहे. पहिल्या दिवसअखेर भारताने 1 विकेट गमवून 16 धावा केल्या. यात कर्णधार रोहित शर्माला आपलं खातंही खोलता आलं नाही.