INDvsNZ : तिसरी वनडे जिंकून टीम इंडियाला भीमपराक्रम करण्याची संधी, न्यूझीलंडला क्लीन स्वीप देणार?
टीम इंडियाने न्यूझीलंड विरुद्धची 3 सामन्यांची मालिका 2-0 अशा फरकाने आधीच जिंकली आहे. आता रोहित शर्माच्या नेतृत्वात तिसरा सामना जिंकून टीम इंडियाला पराक्रम करण्याची संधी आहे.
इंदूर : टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात मंगळवारी 24 जानेवारीला तिसरा एकदिवसीय सामना खेळवण्यात येणार आहे. टीम इंडियाने न्यूझीलंड विरुद्धच्या पहिले 2 सामने जिंकून मालिकाही जिंकली आहे. आता टीम इंडियाला श्रीलंकेनंतर न्यूझीलंडला पराभूत करत क्लीन स्वीप देण्याची सुवर्णसंधी आहे. तिसरा सामना जिंकल्यास टीम इंडियाला भीमपराक्रम करण्याची संधी आहे. टीम इंडियाला तिसरा सामना जिंकून न्यूझीलंडला पछाडत आयसीसी रँकिंगमध्ये अव्वल स्थान पटकावण्याची संधी आहे.
उभयसंघातील एकदिवसीय मालिका सुरु होण्याआधी न्यूझीलंड 117 रेटिंग्ससह पहिल्या स्थानी विराजमान होती. तर इंग्लंड 113 गुणांसह दुसऱ्या, ऑस्ट्रेलिया 112 रेटिंग्ससह तिसऱ्या आणि टीम इंडिया 110 रेटिंग्सह चौथ्या क्रमांकावर होती. आता टीम इंडियाने न्यूझीलंडला क्लिन स्वीप केलं तर टीम इंडिया 114 रेटिंग्ससह पहिल्या स्थानी विराजमान होईल. तर न्यूझीलंडची थेट चौथ्या स्थानी घसरण होईल.
त्यामुळे आता टीम इंडिया तिसरा सामना जिंकून क्लीन स्वीपसह 1 नंबर होणार की न्यूझीलंड विजय मिळवत शेवट गोड करणार, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
दरम्यान दुसऱ्या बाजूला टीम इंडियाने मालिका आधीच जिंकली आहे. यामुळे तिसऱ्या सामन्यातील प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल होऊ शकतात. कॅप्टन रोहित शर्मा अनुभवी खेळाडूंऐवजी युवा खेळाडूंना संधी देऊ शकतो.
श्रेयस अय्यरला बॅक इंज्युरीमुळे एकदिवसीय मालिकेतून माघार घ्यावी लागली. त्याच्या जागी संघात रजत पाटीदारचा समावेश करण्यात आला. रजत हा मूळचा इंदूरचा आहे. तिसरा सामनाही इंदूरला आहे. त्यामुळे कॅप्टन रोहित होम ग्राउंडवर लोकल बॉय अर्थात रजतला एकदिवसीय पदार्पणाची संधी देऊ शकतो.
टीम इंडिया : रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, इशान किशन (विकेटकीपर), विराट कोहली, रजत पाटीदार, सूर्यकुमार यादव, केएस भरत (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, वॉशिंगटन सुंदर, शाहबाज अहमद, शार्दुल ठाकुर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि उमरान मलिक.
न्यूजीलंड: टॉम लॅथम (कर्णधार), फिन एलेन, मायकल ब्रेसवेल, मार्क चॅपमैन, डेवोन कॉनवे, जॅकब डफी, लॉकी फर्ग्यूसन, डेरिल मिचेल, हेनरी निकोल्स, ग्लेन फिलिप्स, मिचेल सॅंटनर, हेनरी शिपले, ईश सोढी आणि ब्लेयर टिकनर.