IND vs PAK: भारताविरुद्धच्या सामन्याआधी पाकिस्तानसाठी एक Good News
आशिया कप (Asia cup) स्पर्धेची सुपर 4 फेरी आजपासून सुरु होत आहे. भारत-पाकिस्तान (IND vs PAK) मध्ये उद्या सामना रंगणार आहे. या मॅच आधी पाकिस्तानसाठी एक चांगली बातमी आहे.
मुंबई: आशिया कप (Asia cup) स्पर्धेची सुपर 4 फेरी आजपासून सुरु होत आहे. भारत-पाकिस्तान (IND vs PAK) मध्ये उद्या सामना रंगणार आहे. या मॅच आधी पाकिस्तानसाठी एक चांगली बातमी आहे. नसीम शाह भारताविरुद्धच्या सामन्यात खेळू शकतो. नसीम शाहने (Naseem Shah) तो फिट असल्याचं म्हटलं आहे. भारताविरुद्धच्या पहिल्या सामन्यात नसीम शाह पूर्णपणे तंदुरुस्त वाटला नाही. त्याचा फटका पाकिस्तानला बसला.
भारताच्या दोन प्रमुख फलंदाजांच्या त्याने विकेट काढल्या
नसीम शाह अवघ्या 19 वर्षांचा आहे. नसीम शाहने त्याच्या पहिल्याच ओव्हरमधील दुसऱ्या चेंडूवर केएल राहुलला बोल्ड केलं होतं. सूर्यकुमार यादवलाही त्याने क्लीन बोल्ड केलं होतं. दुबईतील उष्ण वातावरणाशी नसीम जुळवून घेऊ शकला नाही. “आता मी फिट आहे. भारताविरुद्ध अपूर्ण राहिलेलं काम मी रविवारी पूर्ण करेन” असं नसीम शाहने म्हटलं आहे. “मला आता फिट वाटत आहे. मागच्यावेळी दुखापतीमुळे मी माझं काम अर्ध्यावर सोडलं होतं. पण रविवारी भारताविरुद्ध अपूर्ण राहिलेलं काम पूर्ण करीन” असं नसीमने म्हटलं आहे. सामा न्यूजने हे वृत्त दिलय.
पाकिस्तान प्रमुख गोलंदाजाविना खेळतोय
पाकिस्तानचा प्रमुख वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी आशिया कप मध्ये नाहीय. दुखापतीमुळे तो या स्पर्धेत खेळत नाहीय. त्याला गुडघे दुखापतीचा त्रास आहे. शाहीनच्या अनुपस्थितीत नसीमने भारताविरुद्ध चांगली कामगिरी केली. त्याने राहुल आणि सूर्यकुमार यादवच्या दोन मोठ्या विकेट काढल्या. “नसीमने चांगली गोलंदाजी केली. शाहीनची अनुपस्थिती जाणवली नाही” अशा शब्दात कॅप्टन बाबर आझमने त्याचं कौतुक केलं होतं.