IND vs SA: दक्षिण आफ्रिका 87 धावात Allout, समजून घ्या भारताच्या विजयाची तीन कारणं
IND vs SA: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच टी 20 सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियाने (IND vs SA) जबरदस्त कमबॅक केलं आहे.
IND vs SA: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच टी 20 सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियाने (IND vs SA) जबरदस्त कमबॅक केलं आहे. भारताने आज राजकोट (Rajkot) सौराष्ट्र क्रिकेट असोशिएशनच्या मैदानावर झालेला सामना 82 धावांनी जिंकला. या विजयामुळे दोन्ही संघ आता 2-2 बरोबरीत आहेत. भारताच्या 170 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा डाव 17 षटकात 87 धावात आटोपला. आता रविवारी होणारा पाचवा सामना निर्णायक ठरणार आहे. दक्षिण आफ्रिकेने पहिले दोन टी 20 सामने जिंकल्यामुळे भारतीय संघ 2-0 असा पिछाडीवर होता. पण विशाखापट्टनममधील तिसऱ्या आणि आज चौथ्या सामन्यात विजय मिळवून जोरदार कमबॅक केलय. विशाखापट्टनम प्रमाणे आजचा सामनाही भारतासाठी ‘करो या मरो’च होता. भारतीय संघाने या सामन्यात विजय मिळवून मालिका विजयाच्या आशा कायम ठेवल्या आहेत. भारताच्या तुलनेत दक्षिण आफ्रिकेचा संघ (South Africa team) मजबूत आहे. भारताने या मालिकेत युवा खेळाडूंना संधी दिली आहे. भारताचे सीनियर खेळाडू रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जाडेजा या मालिकेत खेळत नाहीयत. त्यांना विश्रांती देण्यात आली आहे. भारताच्या युवा खेळाडूंनी आपला दम दाखवून दिला आहे. समजून घेऊया भारताच्या विजयाची तीन कारण
- भारताचा डाव आज अडचणीत होता. पहिल्या 10 षटकात भारताच्या तीन बाद 56 धावा होत्या. दिनेश कार्तिक आज फलंदाजीला मैदानाता आला, तेव्हा भारताच्या चार बाद 81 धावा झाल्या होत्या. त्यावेळी दिनेश कार्तिक आणि हार्दिक पंड्या आज संकटमोचक ठरले. दिनेशने सामन्याची सूत्र हाती घेतली. त्याला उपकर्णधार हार्दिक पंड्याने देखील तितकीच तोलामोलाची साथ दिली. दोघांनी मिळून पाचव्या विकेटसाठी 65 धावांची भागीदारी केली. दिनेश कार्तिकने 27 चेंडूत 55 आणि हार्दिक पंड्याने 31 चेंडूत 46 धावा फटकावल्या. या दोघांच्या बळावर भारताने निर्धारित 20 षटकात 6 बाद 169 धावा केल्या.
- भारताच्या गोलंदाजांनी आज सुरुवातीच्या षटकात अफलातून गोलंदाजी केली. त्यांनी दक्षिण आफ्रिकेच्या क्विंटन डि कॉक आणि अन्य फलंदाजांना मुक्तपणे फलंदाजी करु दिली नाही. योग्य दिशा आणि टप्प्यावर गोलंदाजी केली. सुरुवातीपासून आज दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांवर दबाव ठेवला. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेचा डाव 87 धावात आटोपला. हर्षल पटेलने 2 षटकात 3 धावा देऊन 1 विकेट काढला. युजवेंद्र चहलने 4 ओव्ह्रर्समध्ये 21 धावा देऊन 2 विकेट काढल्या. भुवनेश्वर कुमारने दोन षटकात फक्त 8 धावा दिल्या.
- दिनेश कार्तिकप्रमाणे आवेश खानही भारताच्या विजयाचा हिरो आहे. आवेश खानला पहिल्या तीन सामन्यात एकही विकेट मिळाला नव्हता. त्याने 11 षटकात 87 धावा देऊन एकही विकेट काढली नव्हती. त्यामुळे त्याला बाहेर बसवण्यची चर्चा सुरु होती. पण आज आवेश खानने कमाल केली. त्याने चार ओव्हर्समध्ये 18 धावा देऊन 4 विकेट काढल्या. ड्वेन प्रिटोरियस, रासी वॅन डुसे, मार्को जॅनसेन आणि केशव महाराज या चार विकेट आवेश खानने काढल्या.