Ind vs SL 2nd Test: तिसऱ्या दिवशी पिंक बॉल टेस्टचा निकाल निश्चित, टीम इंडिया विजयापासून 9 विकेट दूर
भारत आणि श्रीलंकेमध्ये (Ind vs SL) खेळवल्या जाणाऱ्या डे-नाइट कसोटी (Day Night Test) सामन्याचा आज तिसरा दिवस आहे. सुरुवातीच्या दोन्ही दिवसांच्या खेळावर भारताने वर्चस्व गाजवलं. भारताने फिरकीला अनुकूल असलेल्या खेळपट्टीवर पहिल्या डावात 252 धावा केल्या.
बंगळुरु : भारत आणि श्रीलंकेमध्ये (Ind vs SL) खेळवल्या जाणाऱ्या डे-नाइट कसोटी (Day Night Test) सामन्याचा आज तिसरा दिवस आहे. सुरुवातीच्या दोन्ही दिवसांच्या खेळावर भारताने वर्चस्व गाजवलं. भारताने फिरकीला अनुकूल असलेल्या खेळपट्टीवर पहिल्या डावात 252 धावा केल्या. श्रेयस अय्यरने सर्वाधिक 92 धावा केल्या. त्यानंतर जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि मोहम्मद शमीने टिच्चून मारा केला. त्यांनी आपल्या गोलंदाजीने श्रीलंकन फलंदाजांना चांगलंच सतावलं. श्रीलंकेने पहिल्या दिवसाच्या अखेरीस सहा विकेट गमावून 86 धावा केल्या होत्या. दुसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी केवळ 6 षटकात पाहुण्यांच्या उरलेल्या 4 फलंदाजांना बाद केलं. श्रीलंकेचा संघ 109 धावांवर गारद झाला. त्यानंतर भारतीय संघ दुसऱ्या डावातील फलंदाजीसाठी आला. भारताने दुसरा डाव 9 बाद 303 धावांवर घोषित केला आणि श्रीलंकेच्या संघाला दुसऱ्या डावातील फलंदाजीसाठी आमंत्रित केलं.
447 धावांचं लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या श्रीलंकेने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 1 बाद 28 धावांपर्यंत मजल मारली आहे. उर्वरित तीन दिवसात श्रीलंकेला विजयासाठी 419 धावांची आवश्यकता आहे. तर भारताला 9 विकेट्सची गरज आहे. बंगळुरुची गोलंदाजांना साथ देणारी खेळपट्टी आणि भारतीय गोलंदाजांचा फॉर्म पाहता पिंक बॉल कसोटीचा निकाल आजच लागेल. हा सामना पूर्णपणे भारताच्या मुठीत आहे. भारत विजयापासून केवळ 9 विकेट दूर आहे.
पहिला डाव भारताचा
भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा कसोटी सामना बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जात आहे. 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारत 1-0 ने आघाडीवर आहे. हा सामना जिंकून भारत श्रीलंकेला व्हाईटवॉश देण्याच्या तयारीत आहे. बंगळुरु कसोटीचा पहिला दिवस हा टीम इंडियाच्या नावावर राहिला. पहिल्या दिवशी टीम इंडियानं 252 धावा केल्या. खेळपट्टीकडून मिळणाऱ्या मदतीचा लाभ घेण्यात श्रीलंकन गोलंदाजांना अपयश आलं. टीम इंडियाचा फलंदाज श्रेयस अय्यरनं 92 धावा केल्या. त्यानंतर श्रीलंकेच्या डावाची सुरुवात देखील खराब झाली. दिवसअखेर त्यांनी 86 धावा केल्या. दुसऱ्या दिवशी त्यात 23 धावा जोडून उर्वरित 4 फलंदाजही बाद झाले. श्रीलंकेकडून एकट्या अँजेलो मॅथ्यूजने सर्वाधिक 43 धावांचं योगदान दिलं. या डावात भारताकडून एकट्या जसप्रीत बुमराहनं 5 गडी बाद केले. मोहम्मद शमीने 2, रवीचंद्रन अश्विनने 2 बळी घेतले, तर अक्षर पटेलने 1 विकेट घेतली.
दुसऱ्या डावात भारताकडून पुन्हा एकदा श्रेयस अय्यरने सर्वाधिक धावा फटकावल्या. त्याने 87 चेंडूत 67 धावांची खेळी केली. तर ऋषभ पंतने आक्रमक अर्धशतक झळकावलं. त्याने अवघ्या 32 चेंडूत 50 धावा फटकावल्या. त्याचबरोबर कर्णधार रोहित शर्माने 46 धावांचं योगदान दिलं. या डावात श्रीलंकेचा प्रवीण जयविक्रमा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला, त्याने 4 बळी घेतले. तर लसिथ एम्बुलडेनियाने 3 बळी घेतले.
भारताची Playing 11
रोहित शर्मा (कर्णधार), मयंक अग्रवाल, हनुमा विहारी, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, अक्षर पटेल
श्रीलंकेची Playing 11
दिमुथ करुणारत्ने (कर्णधार), लाहिरू थिरिमाने, कुस मेंडिस, अँजेलो मॅथ्यूज, धनंजया डी सिल्वा, चरिथ असलंका, निरोशन डिकवेला, सुरंगा लकमल, लसिथ एम्बुल्डेनिया, प्रवीण जयविक्रमा, विश्वा फर्नांडो
इतर बातम्या
हार्दिक पंड्या म्हणतो Gujarat Titans चं यश खेळाडूंचं, अपयश माझं; गोलंदाजीबद्दल दिली मोठी अपडेट
IPL 2022: इंग्लिश क्रिकेटपटूंवर विश्वास कसा ठेवायचा? शेवटच्या क्षणी दिला धोका