रिंकु सिंहने 19व्या षटकात फिरवला सामना, गोलंदाजीत अशी केली कमाल
भारत आणि श्रीलंका यांच्यात तीन सामन्यांची टी20 मालिका भारताने 3-0 ने जिंकली. मालिकेत भारताने श्रीलंकेला क्लिन स्विप दिला. तिसऱ्या सामन्यावर श्रीलंकेची पूर्ण पकड होती. पण विजयाचा घास भारताने तोंडातून खेचून आणला. या सामन्यात रिंकु सिंहचं षटक मॅच विनर ठरलं. त्याने या षटकात दोन विकेट घेत श्रीलंकेला बॅकफूटवर ढकललं.
कर्णधार सूर्यकुमार यादव आणि प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यासाठी श्रीलंका दौरा पुढच्या वाटचालीसाठी प्रोत्साहन देणारा ठरला. तीन सामन्यांची टी20 मालिका भारताने 3-0 ने जिंकली. पहिले दोन टी20 सामने भारताने सहज जिंकले होते. पण तिसऱ्या सामन्यात श्रीलंकेने भारताची बऱ्यापैकी कोंडी केली होती. नाणेफेकीचा कौल श्रीलंकेच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. खेळपट्टी फिरकीला मदत करणारी होती. त्याचा श्रीलंकेने फायदा घेतला आणि प्रथम गोलंदाजी करत भारताला 20 षटकात 9 गडी गमवून 137 धावांवर रोखलं. तसेच विजयासाठी 138 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान गाठण्यासाठी आलेल्या श्रीलंकेने चांगली सुरुवात केली. पहिली विकेट 58 धावांवर आणि दुसरी विकेट 110 धावांवर पडली. त्यामुळे पुढच्या धावा सहज होतील असं वाटत होतं. पण 117 धावांवर तिसरी विकेट पडली आणि घसरगुंडी सुरु झाली. खासकरून 19 व्या षटकात कमाल झाली. कारण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रिंकु सिंहने पहिल्यांदाच षटक टाकलं आणि हे षटक कायमस्वरुपी स्मरणात राहिलं.
श्रीलंकेला 12 चेंडूत 9 धावांची आवश्यकता होती. कर्णधार सूर्यकुमार यादवने 19वं षटक रिंकु सिंहच्या हाती सोपवलं. फिरकीला मदत करणारी खेळपट्टी असल्याने त्याने तसा निर्णय घेतला. रिंकु सिंह राईट आर्म ऑफ ब्रेक टाकतो हे त्याला माहिती होतं. पण त्याला षटक देण्याचं धाडस सूर्यकुमारच करू शकतो. रिंकुच्या पहिल्या चेंडूवर धाव आली नाही. दुसऱ्या चेंडूवर त्याने कुसल परेराचा स्वत:च झेल घेतला आणि तंबूत पाठवलं. तिसऱ्या चेंडूवर कामिंदू मेंडिसने 1 धाव घेतली. चौथ्या चेंडूवर रमेश मेंडिसने 2 धावा घेतल्या. पाचवा चेंडू निर्धाव टाकला आणि सहाव्या चेंडूवर रमेश मेंडीसला बाद केलं. यामुळे पुढच्या षटकासाठी 6 धावांचं आव्हान आलं.
सूर्यकुमार यादवने 20 वं षटक स्वत: टाकण्याचा निर्णय घेतला. पहिला चेंडू निर्धाव गेला. दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर विकेट मिळाली. चौथ्या चेंडूवर एक धाव आली. पाचव्या आणि सहाव्या चेंडूवर प्रत्येकी 2 धावा आल्या आणि सामना बरोबरीत सुटला. सामन्याच्या निकालासाठी सुपर ओव्हर टाकली गेली.
सूर्यकुमार यादवने हे षटक वॉशिंग्टन सुंदरच्या हाती सोपवलं. पहिला चेंडू वाइड टाकला. त्यानंतर पुन्हा टाकलेल्या चेंडूवर एक धाव आली. दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर विकेट मिळाली. भारताला जिंकण्यासाठी फक्त 3 धावांचं आव्हान मिळालं. हे आव्हान गाठण्यासाठी सूर्यकुमार आणि गिल जोडी मैदानात आली. सूर्यकुमारने स्ट्राईक घेत पहिल्याच चेंडूवर चौकार मारला आणि विजय मिळवला.