IND vs WI: भविष्याची तयारी? ऋषभ पंतकडे दिली जाणार महत्त्वाची जबाबदारी, लवकरच होणार घोषणा
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे सीरीजसाठी केएल राहुल संघाचा उपकर्णधार होता. पण रोहितच्या अनुपस्थितीत त्याला नेतृत्वाची संधी मिळाली.
मुंबई: येत्या सहा फेब्रुवारीपासून भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये (India vs West indies) वनडे मालिकेला (oneday series) सुरुवात होणार आहे. वनडे नंतर दोन्ही संघांमध्ये तीन टी-20 सामन्यांची मालिका होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर ही वनडे सामन्यांची मालिका होणार आहे. भारताचा वनडे आणि टी-20 संघाचा कॅप्टन रोहित शर्मा (Rohit sharma) अखेर नेतृत्वाची धुरा संभाळणार आहे. हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे रोहित दक्षिण आफ्रिकेतील कसोटी आणि वनडे मालिकेला मुकला होता. कर्णधार म्हणून रोहितची ही पहिलीच सीरीज असून त्याला स्वत:च्या नेतृत्व गुणांचे कौशल्य दाखवण्याची संधी आहे. याआधी रोहितने IPL मध्ये मुंबई इंडियन्सचं नेतृत्व केलं आहे. त्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने आयपीएलचं पाचवेळा जेतेपद मिळवलं आहे. रोहितला आता भारतीय संघासाठी तशीच कामगिरी करुन दाखवावी लागणार आहे. त्याच्याकडून बऱ्याच अपेक्षा आहेत.
केएल राहुल संघाचा उपकर्णधार होता वेस्ट इंडिज विरुद्धच्या पहिल्या वनडेसाठी ऋषभ पंतच्या नावाची उपकर्णधार म्हणून घोषणा करण्यात येऊ शकते. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे सीरीजसाठी केएल राहुल संघाचा उपकर्णधार होता. पण रोहितच्या अनुपस्थितीत त्याला नेतृत्वाची संधी मिळाली. पण राहुलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिकेकडून 3-0 असा पराभव झाला.
केएल राहुल पहिल्या वनडेमध्ये खेळणार नाहीय. त्याच्याजागी पंतकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी दिली जाऊ शकते. बीसीसीआयमधील सुत्रांनी पंतला उपकर्णधार बनवण्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. इनसाइड स्पोर्ट्सने हे वृत्त दिलं आहे.
शिखर धवनही सक्षम “हा फक्त एका मॅचचा प्रश्न आहे. केएल राहुल दुसऱ्या सामन्यापासून उपलब्ध असेल. शिखर आणि ऋषभ दोघेही उपकर्णधारपदाची जबाबदारी संभाळण्यासाठी सक्षम आहेत. ऋषभ विकेटकिपर असल्यामुळे रिव्ह्यू घेणं, क्षेत्ररक्षण लावणं, यामध्ये त्याची भूमिका, सल्ला महत्त्वाचा असतो. त्यामुळे एका सामन्यासाठी त्याला उपकर्णधार बनवलं जाऊ शकतं” असं बीसीसीआय अधिकाऱ्यांनी इनसाइड स्पोर्ट्सला सांगितलं.
विराट कोहलीने टेस्ट कॅप्टनशिप सोडल्यामुळे त्याच्याजागी कोणाची वर्णी लागते, याची उत्सुक्त आहे. सध्यातरी टेस्ट कॅप्टनशिपच्या शर्यतीत रोहित शर्मासह ऋषभ पंतच्या नावाचीही चर्चा आहे. ऋषभ पंतकडे कसोटी संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी दिली पाहिजे, असं काही माजी क्रिकेटपटुंचही मत आहे.
IND vs WI Rishabh Pant to be named vice captain for first ODI says BCCI source