IND vs ENG: विराट कोहली, रोहित शर्माला इंग्लंडच्या बाजारात चाहत्यांनी पकडलं, फोटो झाला व्हायरल
पुढच्या महिन्यापासून भारताच्या इंग्लंड दौऱ्याला (India England Tour) सुरुवात होत आहे. भारतीय संघ एक कसोटी, तीन वनडे आणि तीन टी 20 सामन्यांची मालिका खेळणार आहे.
मुंबई: पुढच्या महिन्यापासून भारताच्या इंग्लंड दौऱ्याला (India England Tour) सुरुवात होत आहे. भारतीय संघ एक कसोटी, तीन वनडे आणि तीन टी 20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. मागच्यावर्षी रद्द झालेला कसोटी सामना भारतीय संघ या वर्षी खेळणार आहे. कोविड-19 (Covid-19) मुळे कसोटी रद्द झाली होती. भारतीय संघ या कसोटी मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. या कसोटी सामन्यासाठी विराट कोहली, (Virat kohli) कॅप्टन रोहित शर्मा इंग्लंडमध्ये दाखल झाले आहेत. भारतीय खेळाडूंनी या दौऱ्यासाठी सरावही सुरु केलाय. बीसीसीआयने ट्रेनिंग सेशनचे फोटोही शेअर केले आहेत. आता सोशल मीडियावर काही फोटो व्हायरल झाले आहेत. त्यात एका चाहत्याने विराट आणि रोहितसोबत सेल्फी फोटो काढले.
चाहत्यांनी घातला गराडा
लंडनमध्ये दाखल झाल्यानंतर विराट कोहली आणि रोहित शर्मा शॉपिंग करण्यासाठी बाहेर पडले. शॉपिंग करताना बाजारात त्यांना एका चाहत्याने गाठलं. मार्केटमध्ये दोन स्टार भारतीय क्रिकेटपटूंना पाहिल्यानंतर चाहत्यांनी त्यांच्याभोवती गराडा घातला. त्यानंतर सेल्फी काढण्यासाठी एकच गर्दी झाली. कोहली आणि रोहितने चाहत्यांना निराश केलं नाही. अनेक फॅन्सना, तर एका स्टारसोबत फोटो काढता आला.
A fan clicked picture with both Virat Kohli and Rohit Sharma in London. pic.twitter.com/ozdhIHo8lH
— CricketMAN2 (@ImTanujSingh) June 19, 2022
कसं आहे वेळापत्रक?
भारत आणि इंग्लंडमध्ये पाचवा कसोटी सामना एजबेस्टन येथे 1 ते 5 जुलै दरम्यान खेळला जाणार आहे. कसोटी संपल्यानंतर 7 जुलै ते 17 जुलै दरम्यान भारतीय संघ तीन वनडे आणि तीन टी 20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. टीम इंडियाच याच महिन्यात आयर्लंड विरुद्ध दोन टी 20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. त्यासाठी भारत आपला दुसरा संघ आयर्लंडला पाठवणार आहे. आयर्लंड दौऱ्यात भारतीय संघाचं नेतृत्व हार्दिक पंड्या करणार आहे. भारतीय संघ 24 जूनला लीसेस्टशर विरुद्ध 4 दिवसीय सराव सामना खेळणार आहे.