T 20 वर्ल्ड कपसाठी 13 क्रिकेटपटू ठरले, फक्त 2 जागांसाठी 5 खेळाडूंमध्ये तीव्र स्पर्धा
पुढच्या 15 दिवसात T 20 वर्ल्ड कपसाठी (T 20 World cup) संघ निवडला जाणार आहे. BCCI च्या निवड समितीला कुठल्या 15 खेळाडूंची निवड केली, ते आयसीसीला कळवावं लागणार आहे.
मुंबई: पुढच्या 15 दिवसात T 20 वर्ल्ड कपसाठी (T 20 World cup) संघ निवडला जाणार आहे. BCCI च्या निवड समितीला कुठल्या 15 खेळाडूंची निवड केली, ते आयसीसीला कळवावं लागणार आहे. आशिया कप स्पर्धा संपल्यानंतर टी 20 वर्ल्ड कपसाठी संघ निवड होईल. चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीची हेड कोच राहुल द्रविड (Rahul Dravid) आणि कॅप्टन रोहित शर्मा सोबत मुंबईत बैठक होईल. त्यातून संघ निवडला जाईल. टीम इंडियासाठी एक चांगली बाब म्हणजे, टी 20 वर्ल्ड कपसाठी 13 खेळाडू जवळपास निश्चित आहेत. जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेलची दुखापत ही टीम इंडियासाठी चिंता वाढवणारी बाब आहे. भारताच्या टी 20 वर्ल्ड कप संघात 2 जागांसाठी 5 खेळाडूंमध्ये तीव्र स्पर्धा आहे.
भारताकडे पर्याय आहेत, पण….
दोघे पूर्णपणे फिट आहेत किंवा नाही, हे ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेनंतरच समजेल. भारताकडे पर्याय आहेत, पण त्यांच्याकडे तितका अनुभव नाही. बुमराह आणि हर्षल पटेल दोघे अनफिट ठरले, तर मोहम्मद शमीला संघात स्थान मिळू शकते. मोहम्मद शमीचं वय लक्षात घेऊन त्याचा टी 20 टीमसाठी विचार होत नाही. पण त्याचा अनुभव लक्षात घेता, बुमराह नसल्यास त्याला प्राधान्य मिळू शकतं. मोहम्मद शमी कसोटी आणि वनडे मध्ये भारताचा प्रमुख गोलंदाज आहे.
रोहित शर्मा काय म्हणाला?
टी 20 वर्ल्ड कपला अजून अडीच महिने बाकी आहेत. त्याआधी आशिया कप आणि ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मायदेशात मालिका होणार आहेत. “80 ते 90 टक्के संघ ठरला आहे. तीन ते चार बदल होऊ शकतात. परिस्थितीवर सगळं अवलंबून आहे” असं रोहित शर्माने आधीच स्पष्ट केलय.