IND vs PAK, WWC 2022: 18 धावात पाच विकेट, त्यानंतर पूजा-स्नेहा जोडीचा पाकिस्तानच्या आत्मविश्वासावर प्रहार
IND vs PAK, WWC 2022: वर्ल्डकप स्पर्धेत भारत आणि पाकिस्तानचे संघ आमने-सामने आले आहेत. दोन्ही संघांमध्ये महामुकाबला सुरु आहे.
IND vs PAK, WWC 2022: वर्ल्डकप स्पर्धेत भारत आणि पाकिस्तानचे संघ आमने-सामने आले आहेत. दोन्ही संघांमध्ये महामुकाबला सुरु आहे. भारताने पाकिस्तानला (India vs Pakistan) विजयासाठी 245 धावांचं लक्ष्य दिलं आहे. भारताची सुरुवात फारशी चांगली झाली नव्हती. शेफाली वर्माच्या रुपात भारताला पहिला झटका बसला होता. एकवेळ अशी होती की, 18 धावात भारताने पाच विकेट गमावल्या होत्या. पण त्यानंतरही भारताने 244 धावांचे लक्ष्य उभारले. पूजा वस्त्राकर (Pooja Vastrakar) आणि स्नेह राणा (Sneh Rana) यांच्या दमदार फलंदाजीमुळे भारताला आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली. स्नेह राणाने 48 चेंडूत 53 धावांची आणि पूजाने 59 चेंडूत 67 धावांची तडाखेबंद खेळी केली. दोघींनी सातव्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली.
संघाची धावसंख्या 96 असताना भारताची दुसरी विकेट गेली. दीप्ती शर्मा (40) धावांवर आऊट झाली. त्यानंतर स्मृती मानधना, उपकर्णधार हरमनप्रीत कौर, ऋचा कौच आणि कॅप्टन मिताली राज झटपट माघारी परतले. एकवेळ भारताचा डाव 200 पर्यंत तरी पोहोचेल? अशी मनात शंका निर्माण झाली होती.
पण त्यानंतर पूजा आणि स्नेहने डाव सावरला. पूजा आणि स्नेहने संपूर्ण चित्रच पालटून टाकलं. दोघींनी पाकिस्तानच्या महिला गोलंदाजावर हल्लाबोल करत खोऱ्याने धावा वसूल केल्या. स्नेह राणाने 48 चेंडूत 53 धावांच्या खेळीत चार चौकार लगावले. पूजाने 59 चेंडूत 67 धावांच्या खेळीत आठ चौकार फटकावले. या दोघींच्या झंझावती फलंदाजीमुळे भारताला सन्मानजनक धावसंख्या उभारता आली. पूजा आणि स्नेहमध्ये 97 चेंडूत 122 धावांची भागीदारी झाली. त्याआधी स्मृती आणि दीप्तीमध्ये दुसऱ्या विकेटसाठी 116 चेंडूत 92 धावांची भागीदारी झाली. स्मृती मानधनाने 75 चेंडूत 52 धावांची अर्धशतकी खेळी केली. या खेळीत तिने तीन चौकार आणि एक षटकार लगावला.