Mumbai Indians IPL 2022: मुंबई इंडियन्सची मैदानात प्रॅक्टीस सुरु असताना अचानक मधमाशांचा हल्ला
Mumbai Indians IPL 2022: मुंबई इंडियन्ससाठी (Mumbai Indians) यंदाचा IPL 2022 चा सीजन खूपच खराब ठरला आहे. पाच वेळच्या चॅम्पियन मुंबई इंडियन्सचा सलग सहा सामन्यात पराभव झाला आहे.
मुंबई: मुंबई इंडियन्ससाठी (Mumbai Indians) यंदाचा IPL 2022 चा सीजन खूपच खराब ठरला आहे. पाच वेळच्या चॅम्पियन मुंबई इंडियन्सचा सलग सहा सामन्यात पराभव झाला आहे. यंदाच्या सीजनमध्ये मुंबई इंडियन्सचा संघ एक सामना तरी जिंकेल का? हे कोणी खात्रीलायकपणे सांगू शकत नाही. मुंबई इंडियन्सचा संघ अजूनही आपल्या पहिल्या विजयाच्या शोधात आहे. विजय मिळवण्यासाठी आपल्या चूकांवर मात करावी लागेल. त्यासाठी जोरदार सराव आवश्यक आहे. मुंबई इंडिन्यसच्या तयारीमध्ये छोट्या-मोठ्या अडचणी येत आहेत. बुधवारी मुंबई इंडियन्सचा संघ सरावासाठी मैदानात उतरला. त्यावेळी अचानक मैदानामध्ये मधमाशा (Bee) घुसल्या. मुंबई इंडियन्सचा पुढचा सामना कट्टर प्रतिस्पर्धी चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध होणार आहे.
या सामन्याआधी मुंबई इंडियन्सचा संघ जोरदार तयारी करतोय. बुधवारी 20 एप्रिलला टीमचा सराव सुरु असताना मधमाशा अचानक मैदानात घुसल्या. त्यामुळे सराव सत्रात व्यत्यय निर्माण झाला.
झुंडीने मैदानात घुसल्या मधमाशा
मुंबई इंडियन्सच्या सोशल मीडियावरुन हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आलाय. या व्हिडिओत झुंडीने मधमाशा मैदानात घुसल्याचं दिसत आहे. अचानक घुसलेल्या या मधमाशांपासून बचाव करण्यासाठी मुंबई इंडियन्सचे खेळाडू लगेच मैदानात पालथे झोपले. आपला चेहरा त्यांनी झाकून घेतला. दिलासा देणारी बाब म्हणजे कुठलाही खेळाडू किंवा सपोर्ट स्टाफमधील सदस्याला मधमाशा चावल्या नाहीत. काही वेळाने मधमाशा मैदानातून निघून गेल्यानंतर सराव पुन्हा सुरु झाला.
To bee or not to bee in training was a question yesterday! ??#OneFamily #DilKholKe #MumbaiIndians MI TV pic.twitter.com/qaTaHjjca6
— Mumbai Indians (@mipaltan) April 20, 2022
पुढचा सर्वात मोठा धोका अजून टळलेला नाही
रोहित शर्माचा संघ मधमाशाच्या हल्ल्यापासून वाचला. पण पुढचा सर्वात मोठा धोका अजून टळलेला नाही. गुरुवारी 21 एप्रिलला नवी मुंबईच्या डी.वाय.पाटील स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्समध्ये सामना होणार आहे. योगायोग म्हणजे लीगमधले हे दोन्ही सर्वात यशस्वी संघ आहेत. पण यंदाच्या सीजनमध्ये दोन्ही संघ खराब कामगिरी करत आहेत. मुंबईचा संघ सहा पैकी सहासामने हरलाय, तर चेन्नईची टीम सहा पैकी फक्त एक सामना जिंकू शकली आहे. पाच सामन्यात त्यांचा पराभव झाला आहे. चेन्नई विरुद्ध मुंबई इंडियन्सचा रेकॉर्ड चांगला आहे. या सामन्यात तरी निदान पराभवाची साखळी तुटेल, अशी रोहित शर्माची अपेक्षा असेल.