IPL मध्ये ऑस्ट्रेलियाची गरज संपली का? हे आकडेच सर्वकाही सांगतील
दोन दिवसांच्या महालिलावात विकल्या गेल्या सर्व ऑस्ट्रेलियन खेळाडूंना एकूण 59.7 कोटी रुपये मिळाले आहेत. एका बाजूला ऑस्ट्रेलियन खेळाडू विकले गेले नाहीत, तर दुसऱ्या बाजूला जे कांगारु विकले गेले त्यांच्या किंमतीदेखील घटल्या आहेत.
मुंबई : एक काळ होता जेव्हा इंडियन प्रीमियर लीगमध्ये ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा (Australian Players) वरचष्मा पाहायला मिळत होता. याआधीच्या आयपीएल स्पर्धांमध्ये ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर पैशांचा पाऊस पडला आहे. परंतु आयपीएल-2022 च्या मेगा ऑक्शनमध्ये (IPL-2022 Mega Auction) असे झाले नाही. ऑस्ट्रेलियन खेळाडूंसाठी बोली लावण्याऐवजी फ्रँचायझींनी भारतातील खेळाडूंवर पैसे उधळले. याचा परिणाम असा झाला की स्टीव्ह स्मिथ (Steve Smith), अॅडम झाम्पा, अॅरॉन फिंचसारखे खेळाडू विकले जाऊ शकले नाहीत. आयपीएलमध्ये यावेळी एकूण 11 ऑस्ट्रेलियन खेळाडू विकले गेले. यानंतर आयपीएलच्या आगामी हंगामात सहभागी होणाऱ्या ऑस्ट्रेलियन खेळाडूंची एकूण संख्या 13 झाली आहे.
स्टीव्ह स्मिथ राजस्थान रॉयल्सचा कर्णधारही राहिला आहे. राजस्थानपूर्वी तो रायझिंगने पुणे सुपरजायंट्सचा कर्णधार होता. त्याच्या नेतृत्वात पुण्याचा संघ अंतिम फेरीत पोहोचला होता. मात्र यावेळी त्याला कोणत्याही संघाने विकत घेतले नाही. अॅडम झाम्पा देखील त्याच्या लेग स्पिनने प्रभाव पाडू शकतो परंतु यावेळी फ्रँचायझींनी त्याच्यामध्ये रस दाखवला नाही.
किंमती घटल्या
दोन दिवसांच्या महालिलावात विकल्या गेल्या सर्व ऑस्ट्रेलियन खेळाडूंना एकूण 59.7 कोटी रुपये मिळाले आहेत. एका बाजूला ऑस्ट्रेलियन खेळाडू विकले गेले नाहीत, तर दुसऱ्या बाजूला जे कांगारु विकले गेले त्यांच्या किंमतीदेखील घटल्या आहेत. डेव्हिड वॉर्नरची गणना आयपीएलमधल्या यशस्वी कर्णधारांमध्ये केली जाते. तो पूर्वी सनरायझर्स हैदराबाद सोबत होता. या फ्रँचायझीकडून त्याला 12.5 कोटी रुपये मिळत होते. पण यावेळी वॉर्नरला दिल्ली कॅपिटल्सने 6.25 कोटी रुपयांमध्ये विकत घेतले आहे.
जलदगती गोलंदाज नॅथन कुल्टर-नाईल पाच कोटींवरून दोन कोटींवर आला आहे. राईली मेरिडिथ आठ कोटींवरून एक कोटींवर आला आहे. जेसन बहरेनडॉर्फ एक कोटींवरून ७५ लाखांवर आला आहे.
लिलावात विकलेले गेलेले ऑस्ट्रेलियन खेळाडू
डेव्हिड वॉर्नर, टीम डेव्हिड, नॅथन एलिस, शॉन अॅबट, राईली मेरेडिथ, पॅट कमिन्स, मिचेल मार्श, मॅथ्यू वेड, जोश हेझलवूड, नॅथन कुल्टर-नाईल, डॅनियल सॅम्स. याशिवाय मार्कस स्टॉइनिसला लखनौ सुपरजायंट्सने तर ग्लेन मॅक्सवेलला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने रिटेन केले आहे.
अनसोल्ड राहिलेले 32 ऑस्ट्रेलियन खेळाडू
स्टिव्ह स्मिथ, अॅडम झाम्पा, अॅश्टन एगर, मार्नस लॅबुशेन, अँड्र्यू टाय, मोझेस हेन्रिक्स, जेम्स फॉल्कनर, डी’आर्की शॉर्ट, जोश फिलिप, बिली स्टॅनलेक, बेन कटिंग, बेन मॅकडरमॉट, कुर्टिस पॅटरसन, वेस अगर, जॅक वाइल्डरमथ, जोएल कार, एचएल कार, एच. ख्रिस ग्रीन, मॅट केली, बेन द्वारश्विस, हेडन केर, तन्वीर संघा, अॅलेक्स रॉस, जेक वेदरल्ड, नॅथन मॅकअँड्र्यू, टॉम रॉजर्स, लियाम गुथ्री, लियाम हॅचर, जेसोम संघा, मॅट शॉर्ट, एडन कॅहिल, ख्रिस लिन
इतर बातम्या
IND vs WI: टीम इंडियाला तिसरा मोठा धक्का, स्टार ऑलराऊंडर T20 मालिकेतून बाहेर
IPL 2022: ‘एलआयसी’चं आयपीएल कनेक्शन: कोणत्या संघात कुणाचा किती वाटा?