IPL 2022: Gujarat Titans साठी आनंदाची बातमी, हार्दिक पंड्याने करुन दाखवलं
IPL 2022: इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 स्पर्धा सुरु होण्याआधी गुजरात टायटन्स संघासाठी एक चांगली बातमी आहे. मागच्यावर्षी झालेल्या टी-20 वर्ल्डकप नंतर हार्दिक एकाही स्पर्धेत खेळलेला नाही.

बंगळुरु: इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 स्पर्धा सुरु होण्याआधी गुजरात टायटन्स संघासाठी एक चांगली बातमी आहे. गुजरात टायटन्सचा कॅप्टन हार्दिक पंड्याने फिटनेस टेस्ट पास केली आहे. ऑलराऊंडर हार्दिक पंड्याने (Hardik pandya) कठीण समजली जाणारी यो-यो टेस्ट पास केली आहे. बंगळुरु स्थित राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (NCA) हार्दिकची ही चाचणी झाली. फिटनेस टेस्ट पास झाल्यामुळे हार्दिकचा आयपीएल 2022 स्पर्धेत खेळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. हार्दिक पंड्याच्या फिटनेसबद्दल सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात होते. तो खेळण्यासाठी फिट आहे का? या बद्दल विविध शंका-कुशंका व्यक्त केल्या जात होत्या. अखेर आज या सर्व प्रश्नांची उत्तर मिळाली आहेत. हार्दिकने फिटनेस टेस्ट पास करुन दाखवली आहे. हार्दिक फिटनेस चाचणी दरम्यान गोलंदाजीही केली.
यो-यो टेस्टमध्ये किती गुण मिळवले?
मागच्यावर्षी झालेल्या टी-20 वर्ल्डकप नंतर हार्दिक एकाही स्पर्धेत खेळलेला नाही. वर्ल्ड कपमध्येही हार्दिकने गोलंदाजी केली नव्हती. त्यामुळे त्याच्या गोलंदाजी करण्याच्या क्षमतेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येतं होतं. हार्दिकने प्रतितास 135 किमी वेगाने गोलंदाजी केली. यो-यो टेस्ट मध्येही 17 गुण मिळवले. BCCI चे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी त्याला रणजी स्पर्धेत खेळण्याचा सल्ला दिला होता. पण हार्दिकने निवड समिती सदस्यांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केलं होतं.
मेडीकल स्टाफचं बारीक लक्ष
“फिटनेस टेस्टचा कार्यक्रम खास हार्दिकसाठी डिझाईन केलेला नाही. सर्वच क्रिकेटपटूंना फिटनेस टेस्ट पास करण्यासाठी यातून जावं लागतं. सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमधील क्रिकेटपटूंना आयपीएल आधी फिटनेस टेस्ट बंधनकारक आहे” असं वरिष्ठ बीसीसीआय अधिकाऱ्याने इनसाइड स्पोर्टला सांगितलं. सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमधील क्रिकेटपटूंवर NCA च्या मेडीकल स्टाफचं बारीक लक्ष असतं. टीम इंडियातील खेळाडूंना यो-यो टेस्टमध्ये किमान 16.5 स्कोर आवश्यक आहे.
यो-यो टेस्टमध्ये हार्दिकचा सरासरी स्कोर 18 आणि त्यापेक्षा जास्त राहिला आहे. मागच्यावर्षी श्रेयस अय्यरला सुद्धा आयपीएलच्या दुसऱ्या सत्रात खेळण्याआधी फिटनेस टेस्ट द्यावी लागली होती. यावर्षी ऑक्टोंबरमध्ये ऑस्ट्रेलियात होणारी टी-20 वर्ल्डकप स्पर्धा डोळ्यासमोर ठेऊन बीसीसीआय हे सर्व करत आहे.