IPL 2022: 7 सामनेही खेळू शकला नाही 7.25 कोटी रुपयांचा खेळाडू, दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर, KKR ला मोठा झटका
IPL 2022: आयपीएल 2022 (IPL 2022) स्पर्धा शेवटच्या टप्प्यात आलेली असताना, खेळाडू एकापाठोपाठ एक दुखापतीमुळे बाहेर होत आहेत.
मुंबई: आयपीएल 2022 (IPL 2022) स्पर्धा शेवटच्या टप्प्यात आलेली असताना, खेळाडू एकापाठोपाठ एक दुखापतीमुळे बाहेर होत आहेत. आधी रवींद्र जाडेजा, पृथ्वी शॉ आणि आता पॅट कमिन्स (pat cummins) दुखापतीमुळे उर्वरित आयपीएल सामन्यांमध्ये खेळू शकणार नाही. पॅट कमिन्सची दुखापत कोलकाता नाइट रायडर्ससाठी (KKR) मोठा झटका आहे. कमिन्स कोलकाता संघाचा महत्त्वाचा सदस्य आहे. कमिन्सला हिप इंजरी झाली आहे. त्यामुळे तो मायदेशात ऑस्ट्रेलियाला निघून गेला आहे. कमिन्सने अलीकडेच मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात जबरदस्त कामगिरी केली होती. त्याने एका ओव्हरमध्ये तीन विकेट घेऊन मुंबई इंडियन्सचा कबंरड मोडलं होतं. मुंबई इंडियन्स विरुद्धच्या दोन्ही सामन्यात कमिन्सने जोरदार कामगिरी केली होती. पहिल्या सामन्यात त्याने 15 चेंडूत नाबाद 46 धावा फटकावल्या होत्या. पॅट कमिन्ससारखा खेळाडू स्पर्धेबाहेर गेल्यामुळे केकेआरचा प्लेऑफमध्ये दाखल होण्याचा मार्ग अजून खडतर झाला आहे.
खराब फॉर्ममुळे बाहेर बसवलं
IPL 2022 च्या मेगा ऑक्शनमध्ये पॅट कमिन्सला कोलकाता नाइट रायडर्सने 7.25 कोटी रुपयांमध्ये विकत घेतलं होतं. पण तो 7 सामने सुद्धा खेळला नाही. पॅट कमिन्स टीमशी उशिरा जोडला गेला. त्यानंतर खराब फॉर्ममुळे त्याला काही सामने बाहेर बसवलं. तो फक्त पाच सामने केकेआरसाठी खेळला. या पाच सामन्यात त्याने 63 धावा केल्या आणि सात विकेट घेतल्या.
Pat Cummins is heading home early from the IPL with a minor hip injury https://t.co/VOfg0WdHgz
— cricket.com.au (@cricketcomau) May 13, 2022
कमिन्स दुखापतीमधून लवकर सावरणं आवश्यक
मी सर्वोत्तम प्रदर्शन करु शकलो नाही, हे पॅट कमिन्सने स्वत: सुद्धा मान्य केलं आहे. त्याने चार सामन्यात 12 च्या सरासरीने धावा दिल्यात. पॅट कमिन्स दुखापतीमधून सावरल्यानंतर श्रीलंकेचा दौरा आहे. त्यानंतर अनेक मोठ्या सीरीज आणि स्पर्धा आहेत. श्रीलंका दौऱ्यानंतर ऑस्ट्रेलियाला मायदेशात होणाऱ्या टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेत खेळायचं आहे. त्यानंतर मायदेशात त्यांना पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलियन संघ भारत दौऱ्यावर येणार असून एशेस मालिकाही आहे.