IPL 2022: मॅच हातात असताना ऋषभ पंतने विकेट फेकली, पराभवाचं खापर इतर फलंदाजांवर फोडलं!
आयपीएल 2022 च्या (IPL 2022) 10 व्या सामन्यात, गुजरात टायटन्सने दिल्ली कॅपिटल्सचा (GT vs DC) 14 धावांनी पराभव केला. एमसीएच्या मैदानावर प्रथम फलंदाजी करताना गुजरातने 20 षटकांत 171 धावा केल्या होत्या,
पुणे : आयपीएल 2022 च्या (IPL 2022) 10 व्या सामन्यात, गुजरात टायटन्सने दिल्ली कॅपिटल्सचा (GT vs DC) 14 धावांनी पराभव केला. एमसीएच्या मैदानावर प्रथम फलंदाजी करताना गुजरातने 20 षटकांत 171 धावा केल्या होत्या, परंतु जमिनीवर दव पडल्यामुळे गोलंदाजांना फारशी मदत मिळत नसतानादेखील दिल्ली कॅपिटल्स संघाने 14 धावांनी सामना गमावला. दिल्ली कॅपिटल्सला 20 षटकांत 9 गडी गमावून 157 धावाच करता आल्या. या पराभवानंतर कर्णधार ऋषभ पंतने (Rishabh Pant) आपल्या फलंदाजांना चांगलंच सुनावलं. सामन्यानंतर पंत म्हणाला की, ही धावसंख्या गाठता आली असती पण लवकर विकेट गमावल्यामुळे आमचं पुनरागमन करणं कठीण झालं.
सामन्यानंतर पंत म्हणाला, ‘विकेटचा (खेळपट्टी) विचार करता धावसंख्या फार मोठी नव्हती. आम्ही अधिक चांगली फलंदाजी करू शकलो असतो, विशेषतः मधल्या षटकांमध्ये. इतक्या विकेट्स गमावल्यानंतर सामन्यात पुनरागमन करणं कठीण झालं होतं.
ऋषभ पंतने स्वतः काय केलं?
दिल्ली कॅपिटल्सच्या पराभवाचे कारण म्हणजे मधल्या षटकांमध्ये त्यांच्या फलंदाजांची खराब कामगिरी पण आधी जाणून घ्या स्वतः कर्णधार ऋषभ पंतने काय केलं? पंतने 29 चेंडूत 43 धावांची खेळी खेळली आणि दिल्लीसाठी ही सर्वोच्च धावसंख्या ठरली. मात्र, इथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे दिल्लीचा कर्णधार पंतदेखील सहज बाद झाला आणि त्यानंतर दिल्लीने सामन्यात पुनरागमन केलंच नाही. ऋषभ पंत क्रीजवर असेपर्यंत सामना दिल्लीच्या हातात होता. पण 15 व्या षटकात लॉकी फर्ग्युसनच्या चेंडूवर अत्यंत खराब शॉट खेळून या फलंदाजाने प्रतिस्पर्धी संघाला आपली विकेट भेट दिली. लॉकी फर्ग्युसनचा चेंडू ऑफ-स्टंपच्या बाहेर जात होता. या चेंडूवर पंतने लेग साईडवर फटका लगावला आणि चेंडू थेट अभिनव मनोहरच्या हातात गेला. यानंतर फर्ग्युसननेही याच षटकात मागील सामन्यातील हिरो अक्षर पटेलला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.
विजयाचं श्रेय गुजरातच्या गोलंदाजांना
प्रथम फलंदाजी करताना गुजरातने 171 धावा केल्या होत्या. तर दिल्लीने निर्धारीत 20 षटकात नऊ बाद 157 धावा केल्या. पंत मैदानात असताना एकवेळ सामना रंगतदार होणार असं वाटत होतं. पण ऐन वेळी विकेट गेल्या आणि सामना गुजरातच्या बाजूने फिरला. त्यामुळे या विजयाचं श्रेय नक्कीच गुजरातच्या गोलंदाजांना द्यावं लागेल. त्याचबरोबर शुभमन गिलदेखील या विजयामागचा हिरो आहे. शुभमन गिल आणि लॉकी फर्ग्युसनने दिल्लीच्या दुसऱ्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.
शुभमन गिलने 46 चेंडूत 84 धावा फटकावल्या. त्याच्या फलंदाजीमुळे गुजरातचा संघ 171 धावांपर्यंत पोहोचला. तर लॉकी फर्ग्युसनने गोलंदाजीत कमाल केली. त्याने 4 षटकात 28 धावा देत 4 बळी घेतले. लॉकी फर्ग्युसनने सलामीवीर पृथ्वी शॉ, मनदीप सिंग, कर्णधार ऋषभ पंत आणि अक्षर पटेल यांच्या महत्त्वाच्या विकेट घेतल्या.
इतर बातम्या