WTC Final 2023 | टीम इंडियात अजिंक्य रहाणे याची एन्ट्री होणार; सूर्यकुमार यादव याचा पत्ता कट?
टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात जून महिन्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल महामुकाबला होणार आहे. या सामन्याबाबत टीम इंडियाचा कर्णधार राहिलेलास अजिंक्य रहाणे म्हणाला....
मुंबई | टीम इंडियाचा कर्णधार राहिलेला अजिंक्य रहाणे हा गेल्या अनेक महिन्यांपासून बाहेर आहे. रहाणे जानेवारी 2022 पासून एकही कसोटी सामना खेळलेला नाही. मात्र वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलसाठी संधी मिळेल, अशी शक्यता अजिंक्य रहाणे नाकारत नाही. मात्र यासाठी दूरचा पल्ला गाठायचा असल्याचंही रहाणेने मान्य केलं. आयपीएलच्या 16 व्या मोसमात शनिवारी 8 एप्रिल रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यात सामना खेळवण्यात आला. रहाणेने या सामन्यात धमाका केला.
रहाणे याने मुंबई इंडियन्स विरुद्ध आपल्या होमग्राउंड वानखेडे स्टेडियमवर 19 बॉलमध्ये वादळी अर्धशतक ठोकलं. रहाणेने मुंबई विरुद्ध 27 बॉलमध्ये 61 धावांची खेळी करत चेन्नईच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. रहाणेने या अर्धशतकासह ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या आगामी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलसाठी परतीचे मार्ग उघडले आहेत. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल इंग्लंडमधील द ओव्हल इथे 7 ते 11 जून दरम्यान करण्यात आलं आहे.
अजिंक्य रहाणे याला संधी?
बीसीसीआयने नुकतंच वार्षिक करार जाहीर केला. या करारातून बीसीसीआयने रहाणेला वगळलं. रहाणे याने अखेरचा कसोटी सामना हा 2022 जानेवारीमध्ये दक्षिण आफ्रिका विरुद्ध खेळला होता. टीम इंडियाच्या कसोटी संघात श्रेयस अय्यर याने रहाणेची जागा घेतली. अय्यर सध्या पाठीच्या दुखापतीमुळे आयपीएल 2023 मधून बाहेर झाला आहे. तसेच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमधूनही अय्यर बाहेर पडला आहे. तर दुसऱ्या बाजूला सूर्यकुमार यादव आऊट ऑफ फॉर्म आहे. जसप्रीत बुमराह गेल्या अनेक महिन्यांपासून दुखापतीशी झुंज देत आहे. त्यामुळे अशात रहाणेला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.
अजिंक्य रहाणे
Ajinkya Rahane is not giving up on a #WTC23 final spot ?https://t.co/OUy3peGL0K
— ICC (@ICC) April 10, 2023
रहाणे काय म्हणाला?
“आता सुद्धा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलसाठी एक मोठा प्रवास करायचा आहे. मुंबई विरुद्धच्या सामन्यात मला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळेल, याबाबत मला खात्री नव्हती. मी खेळणार हे मला टॉसआधी समजलं. माझ्यासाठी सध्या ही वेळ एकाच गोष्टीबाबत विचार करण्याची आणि वर्तमानात राहण्याची आहे. काहीही होऊ शकतं. मी हार मानणार नाही”, अशी प्रतिक्रिया रहाणे याने मुंबई इंडियन्सवर विजय मिळवल्यानंतर दिली.