LSG vs PBKS | पंजाब किंग्स टीमला मोठा झटका, कॅप्टन शिखर धवन बाहेर, या खेळाडूकडे नेतृत्व
लखनऊ सुपर जायंट्स विरुद्धच्या सामन्याआधी पंजाब किंग्सला मोठा झटका लागला आहे. पंजाब किंग्सचा स्टार बॅट्समन आणि कर्णधार 'गब्बर' हा बाहेर झाला आहे. जाणून घ्या नक्की काय झालं.
लखनऊ | आयपीएल 16 व्या मोसामातील 21 व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध पंजाब किंग्स आमनेसामने आहेत. लखनऊचा हा सामना जिंकून पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी झेप घेण्याचा प्रयत्न आहे. तर पंजाब किंग्स पराभवाची हॅटट्रिक टाळण्यासाठी प्रयत्न करणार आहे. या सामन्यात पंजाब किंग्सने टॉस जिंकून लखनऊला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. मात्र या सामन्यासाठी पंजाबने आपला कॅप्टन बदलला आहे. दोन्ही संघाचे कर्णधार टॉससाठी आले, तेव्हा याबाबतचं चित्र स्पष्ट झालं.
पंजाब किंग्सचा कर्णधार शिखर या सामन्यातून बाहेर झाला आहे. धवन याला खांद्याला दुखापत झाली आहे. धवन या दुखापतीमुळे लखनऊ विरुद्धच्या सामन्याला मुकला आहे. धवन याच्या अनुपस्थितीत महागड्या सॅम करन याने नेतृत्वाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आहे. तसेच धवनच्या जागी प्लेइंग इलेव्हनमध्ये अथर्व तायडे याचा समावेश करण्यात आला आहे.
धवन याच्या गैरहजेरीत आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा ठरलेल्या सॅम करन याला पंजाबची जबाबदारी देण्यात आली आहे. सॅमची आयपीएलमध्ये कॅप्टन्सी करण्याची ही पहिलीच वेळ आहे. सॅमने याआधी कधीही आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये कॅप्टन्सी केली नव्हती. पंजाबने 18 कोटी 50 लाख रुपये मोजून आपल्या ताफ्यात घेतलेल्या या खेळाडूची कर्णधार म्हणून हा पहिलाच अनुभव आहे. त्यामुळे आता सॅम कशी कामगिरी करतो, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
कॅप्टन शिखर धवन बाहेर
Bad news #SherSquad: Gabbar will be missing today's game due to an injury.?
Sadda Sam will be leading the team in his stead! ?#LSGvPBKS #JazbaHaiPunjabi #SaddaPunjab #TATAIPL
— Punjab Kings (@PunjabKingsIPL) April 15, 2023
या खेळाडूला संधी नाहीच
दरम्यान पंजाब किंग्सने या मोसमात सलग 2 सामन्यात विजय मिळवून शानदार सुरुवात केली होती. त्यानंतर पंजाबला सलग 2 मॅचमध्ये सनरायजर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स या संघांकडून पराभव स्वीकारावा लागला. दरम्यान या सामन्यात लियाम लिविंगस्टोन याचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला नाही.
लखनऊ प्लेइंग इलेव्हन | केएल राहुल (कॅप्टन), कायले मेयर्स, दीपक हुडा, मार्कस स्टॉइनिस, कृणाल पांड्या, निकोलस पूरन (विकेटकीपर), आयुष बडोनी, आवेश खान, युधवीर सिंग चरक, मार्क वुड आणि रवि बिश्नोई.
पंजाब किंग्स प्लेइंग इलेव्हन | सॅम कुरेन (कर्णधार), अथर्व तायडे, मॅथ्यू शॉर्ट, हरप्रीत सिंग भाटिया, सिकंदर रझा, जितेश शर्मा (विकेटकीपर), शाहरुख खान, हरप्रीत ब्रार, कागिसो रबाडा, राहुल चहर आणि अर्शदीप सिंग.