IPL 2025, DC vs LSG : लखनौ सुपर जायंट्सच्या 27 कोटींचा पहिल्याच सामन्यात चुराडा! सहा चेंडूत खेळ खल्लास
आयपीएल 2025 स्पर्धेत लखनौ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना सुरु आहे. या सामन्यात सर्वांच्या नजरा या महागड्या खेळाडूंकडे लागल्या होत्या. मात्र पहिल्याच सामन्यात लखनौ सुपर जायंट्सच्या पदरी निराशा पडली. सहा चेंडूतच खेळ खल्लास झाला.

आयपीएल 2025 स्पर्धेच्या चौथ्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स हे संघ आमनेसामने आहेत. या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण लखनौ सुपर जायंट्सने आक्रमक सुरुवात करून दिल्ली कॅपिटल्स संघाला सळो की पळो करून सोडलं. एडन मार्करम आणि मिचेल मार्शने आक्रमक सुरुवात करून दिली. मार्करमची विकेट पडल्यानंतर मिचेल मार्श आणि निकोलस पूरन यांनी दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांचं कंबरडं मोडलं. जो समोर येईल त्याला झोडत सुटले. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्सचे गोलंदाज हतबल झाले होते. ही जोडी फोडण्याचं मोठं आव्हान होतं. या जोडीने 87 धावांची भागीदारी केली होती. ही जोडी फोडण्यात मुकेश कुमार यश आलं. त्याने मिचेल मार्शला 72 धावांवर बाद केलं.
मिचेल मार्श बाद झाल्यानंतर 27 कोटींची सर्वाधिक बोली लागलेला ऋषभ पंत मैदानात उतरला. जवळपास आठ षटकांचा खेळ शिल्लक होता आणि 133 धावा झाल्या होत्या. त्याच्याकडून फार अपेक्षा होत्या. मात्र भ्रमनिरास झाला. त्याला आपलं खातंही खोलता आलं नाही. एकंदरीत 27 कोटी रुपयांना पंत पहिल्या सामन्यात न्याय देऊ शकला नाही. ऋषभ पंतने 6 चेंडूंचा सामना केला आणि खातं न खोलता तंबूत परतला. ऋषभ पंतने संघाचं एक अख्खं षटक वाया घालवलं अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.
दोन्ही संघांची प्लेइंग 11
लखनौ सुपर जायंट्स (प्लेइंग इलेव्हन): एडन मार्कराम, मिचेल मार्श, निकोलस पूरन, आयुष बडोनी, ऋषभ पंत (विकेटकीपर/कर्णधार), डेव्हिड मिलर, प्रिन्स यादव, दिग्वेश राठी, शाहबाज अहमद, शार्दुल ठाकूर, रवी बिश्नोई.
लखनौ सुपर जायंट्स इम्पॅक्ट प्लेयर्स: मणिमरण सिद्धार्थ, अब्दुल समद, हिम्मत सिंग, आकाश सिंग, आरएस हंगरगेकर.
दिल्ली कॅपिटल्स (प्लेइंग इलेव्हन): जेक फ्रेझर-मॅकगर्क, फाफ डू प्लेसिस, अभिषेक पोरेल (यष्टीरक्षक), समीर रिझवी, अक्षर पटेल (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, विप्रज निगम, मिचेल स्टार्क, कुलदीप यादव, मोहित शर्मा, मुकेश कुमार.
दिल्ली कॅपिटल्स इम्पॅक्ट प्लेयर्स: करुण नायर, आशुतोष शर्मा, डोनोवन फरेरा, त्रिपुराना विजय, दर्शन नळकांडे.