IPL Points Table 2022: RCB जिंकली, पण प्लेऑफमध्ये पोहोचणार की नाही, ते सर्वस्वी Mumbai Indians वर अवलंबून
IPL Points Table 2022: गुजरातची टीम आधीच प्लेऑफमध्ये पोहोचली आहे. RCB ला प्लेऑफची आशा जिवंत ठेवण्यासाठी आज विजय आवश्यकच होता. आरसीबीने हा सामना जिंकला.
मुंबई: वानखेडे स्टेडियमवर आज इंडियम प्रिमीयर लीगमधला 67 वा सामना खेळला गेला. लीगमधली टॉपवर असलेली टीम गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोरमध्ये (GT vs RCB) ही लढत झाली. गुजरातची टीम आधीच प्लेऑफमध्ये पोहोचली आहे. RCB ला प्लेऑफची आशा जिवंत ठेवण्यासाठी आज विजय आवश्यकच होता. आरसीबीने हा सामना जिंकला. प्लेऑफच्या शर्यतीत अजूनही ते टिकून आहेत. सलामीवीर विराट कोहली (Virat kohli) (73) आणि कॅप्टन फाफ डू प्लेसिस (44) यांच्या फलंदाजीच्या बळावर बँगलोरने गुजरात टायटन्सवर (Gujarat Titans) आठ विकेट राखून विजय मिळवला. बऱ्याच दिवसांपासून विराटकडून ज्या खेळीची अपेक्षा होती. ती इनिंग तो आज खेळला. विराटने 54 चेंडूत 73 धावा फटाकवल्या. यात आठ चौकार आणि दोन षटकार आहेत. RCB ने आजचा सामना जिंकला असला, तरी प्लेऑफमध्ये ते दाखल होणार की, नाही याचा फैसला शनिवारी होईल.
पॉइंटस टेबलचं समीकरण समजून घ्या
मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्सच्या निकालावर आरसीबीचं प्लेऑफच भवितव्य अवलंबून आहे. मुंबई इंडियन्सने सामना जिंकला, तर आरसीबी प्लेऑफमध्ये जाईल. पण मुंबई हरली तर आरसीबीचं आव्हान संपुष्टात येईल. कारण दिल्लीने मुंबईवर विजय मिळवल्यास, त्यांचे 16 पॉइंटस होतील. अशावेळी नेट रनरेटच्या आधारावर दिल्लीचा संघ प्लेऑफमध्ये जाईल. कारण रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा रनरेट दिल्लीपेक्षा खराब आहे.
IPL पॉइंट्स टेबल
संघ | सामने | जय | पराजय | पॉइंट्स | नेट रन रेट |
---|---|---|---|---|---|
गुजरात टायटन्स | 14 | 10 | 4 | 20 | 0.316 |
राजस्थान रॉयल्स | 14 | 9 | 5 | 18 | 0.298 |
लखनौ सुपर जायंट्स | 14 | 9 | 5 | 18 | 0.251 |
रॉयल चॅलेंजर्स बँगलोर | 14 | 8 | 6 | 16 | -0.253 |
दिल्ली कॅपिटल्स | 14 | 7 | 7 | 14 | 0.204 |
पंजाब किंग्स | 14 | 7 | 7 | 14 | 0.126 |
कोलकाता नाइट रायडर्स | 14 | 6 | 8 | 12 | 0.146 |
सनरायजर्स हैदराबाद | 14 | 6 | 8 | 12 | -0.379 |
चेन्नई सुपर किंग्स | 14 | 4 | 10 | 8 | -0.203 |
मुंबई इंडियन्स | 14 | 4 | 10 | 8 | -0.506 |
हार्दिकची अर्धशतकी खेळी
गुजरातने आज प्रथम फलंदाजी करताना कॅप्टन हार्दिक पंड्याच्या नाबाद (62) आणि राशिद खान नाबाद (19) यांच्या धडाकेबाज फलंदाजीच्या बळावर पाच विकेट गमावून 168 धावा केल्या. बँगलोरने हे लक्ष्य 18.2 षटकात दोन विकेट गमावून पूर्ण केलं.
आणखी दोन टीम्सचं आव्हान संपुष्टात
लखनौ विरुद्ध काल झालेल्या पराभवानंतर कोलकाता नाइट रायडर्सच आव्हान संपुष्टात आलं. आज आरसीबीच्या विजयानंतर पंजाब किंग्स, सनरायजर्स हैदराबादचं आव्हान संपुष्टात आलय. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स हे संघ आधीच स्पर्धेबाहेर गेले आहेत.