Rinku Singh | जिंकलंस भावा! टीम इंडियासाठी पहिलाच दौरा, बिझनेस क्लासमधून आईला कॉल आणि..
Rinku Singh team india Video | टीम इंडिया आयर्लंड विरुद्ध टी 20 मालिका खेळणार आहे. याआधी बीसीसीआयने रिंकू सिंह याचा एक व्हीडिओ शेअर केला आहे.
डब्लिन | टीम इंडिया वेस्ट इंडिजनंतर आता आयर्लंड विरुद्ध टी 20 मालिका खेळण्यासाठी सज्ज झाली आहे. टीम इंडियाची युवा ब्रिगेड आयर्लंड विरुद्ध टी 20 मालिका खेळणार आहे. तर दुसऱ्या बाजूला सिनिअर टीम इंडिया आशिया कपसाठी तयारी करणार आहे. आशिया कपसाठी 23 ऑगस्टपासून ट्रेनिंग कँपमध्ये टीम इंडियाचे खेळाडू सहभागी होणार आहे. तर दुखापतीनंतर टीममध्ये कमबॅक केलेला वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आयर्लंड विरुद्ध नेतृत्व करणार आहे. बुमराह याची कर्णधार म्हणून ही पहिलीच वेळ आहे.
आयर्लंड दौऱ्यासाठी आयपीएल 16 व्या मोसमात धमाका करणाऱ्या रिंकू सिंह यालाही संधी मिळाली आहे. रिंकू सिंह याचा आयर्लंड हा पहिलाच दौरा आहे. तसेच अमरावतीकर जितेश शर्मा हा देखील पहिल्यांदाच टीम इंडियासोबत परदेश दौरा करतोय. त्यामुळे या दोघांसाठी आयर्लंड दौरा खास आहे. बीसीसीआयने या दोघांचा एक व्हीडिओ ट्विट केला आहे. या व्हीडिओत जितेश शर्मा रिंकू सिंह याची मुलाखत घेतोय.
व्हीडिओत नक्की काय?
टीम इंडियासाठी खेळणं हे प्रत्येक भारतीय क्रिकेटपटूचं स्वप्न असतं. मात्र प्रत्येकाचं स्वप्न पूर्ण होतंच असं नाही. पण रिंकूने तडाखेदार खेळीच्या जोरावर टीम इंडियात एन्ट्री मिळवलीच. बीसीसीआयने ट्विट केलेल्या या व्हीडिओत, इंडिया टू आयर्लंड दरम्यानचा प्रवास, नेट्स प्रॅक्टीस आणि फ्लाईटमध्ये बिजनेस क्लासमधून प्रवास करतानाचा रिंकूचा अनुभव या व्हीडिओद्वारे मांडण्यात आला आहे. तसेच रिंकूने आईसोबत बोलल्याचंही म्हटलंय.
“टीम इंडियासोबत तुझा पहिलाच दौरा आहे. पहिल्यांदाच बिजनेस क्लासमधून प्रवास करतोयस, तर तुला कसं वाटतंय”, असा प्रश्न जितेश शर्मा याने रिंकूला विचारला. यावर रिंकू म्हणाला, “नक्कीच चांगलंच वाटतंय, कारण टीम इंडियासाठी खेळणं हे सर्वात मोठं स्वप्न असतं. आईला फोन केला. आई नेहमीच बोलायची की तु टीम इंडियासाठी खेळायचंय. त्यामुळे आई आणि माझं आमच्या दोघांचीही स्वप्नपूर्ती झाली”, असं रिंकून म्हंटलं.
दरम्यान आयर्लंड विरुद्धच्या टी 20 मालिकेला 18 ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. एकूण 3 सामन्यांची ही टी 20 सीरिज असणार आहे. रिंकूसह अनेक युवा खेळाडू टीममध्ये आहे. जसप्रीत बुमराह पहिल्यांदाच कॅप्टन्सी करणार आहे. त्यामुळे ही मालिका युवा खेळाडू आणि कर्णधार म्हणून बुमराहसाठी निश्चितच महत्वाची असणार आहे.