IND vs SL: रोहितने द्विशतकाची संधी हिसकावली की आणखी काही? स्वत: जाडेजानेच सांगितलं खरं कारण
भारत आणि श्रीलंका यांच्यातील मोहाली कसोटीचा दुसरा दिवस (India vs Sri Lanka Mohali Test Day 2) पूर्णपणे फक्त एकाच खेळाडूच्या नावावर होता. तो खेळाडू म्हणजे अष्टपैलू रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja).
मुंबई : भारत आणि श्रीलंका यांच्यातील मोहाली कसोटीचा दुसरा दिवस (India vs Sri Lanka Mohali Test Day 2) पूर्णपणे फक्त एकाच खेळाडूच्या नावावर होता. तो खेळाडू म्हणजे अष्टपैलू रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja). शनिवारी, 5 मार्च रोजी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय क्रिकेट संघाच्या (Indian Cricket Team) या स्टार अष्टपैलू खेळाडूने संस्मरणीय आणि विक्रमी खेळी खेळून इतिहास रचला. आपल्या गोलंदाजीने नेहमीच छाप पाडणाऱ्या जडेजाने कारकिर्दीतील सर्वात मोठी खेळी खेळताना नाबाद 175 धावा फटकावल्या. त्याला द्विशतक झळकावण्याची संधी होती, पण त्याला द्विशतक पूर्ण करण्याची संधी का देण्यात आली नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. भारतीय संघाने 8 बाद 574 धावांवर डाव घोषित केला. अजून 4-5 षटकं खेळ झाला असता तर कदाचित जडेजाने द्विशतक केलं असतं, अशा चर्चा सोशल मीडियावर सुरु आहेत. मग भारतीय कर्णधाराने डाव घोषित का केला? असा सवाल उपस्थित केला जात आहे. दरम्यान, या प्रश्नाचं उत्तर देत रवींद्र जडेजाने सर्वांची तोंडं बंद केली आहेत. ‘डाव घोषित करण्याची सूचना माझीच होती’, असं जडेजाने सांगितलं.
सामन्याच्या पहिल्या दिवशी अर्धशतकाच्या जवळपास नाबाद परतलेल्या जडेजाने शनिवारी पीसीए स्टेडियमवर चौफेर फटकेबाजी करत आपल्या डावाला आकार दिला. 228 चेंडूंच्या संपूर्ण डावात त्याने श्रीलंकेच्या गोलंदाजांना एकही संधी दिली नाही. आधी त्याने कारकिर्दीतील दुसरे कसोटी शतक झळकावले आणि नंतर दुसऱ्या सत्रात धावांचा वेग वाढवला. यादरम्यान त्याने आधी रविचंद्रन अश्विन आणि नंतर मोहम्मद शमीसोबत 7 व्या आणि 9 व्या विकेटसाठी शतकी भागीदाऱ्या केल्या. टी-ब्रेकच्या अगदी आधी, जेव्हा तो दुहेरी शतकाच्या दिशेने वाटचाल करत होता, तेव्हा कर्णधार रोहित शर्माने डाव घोषित केला.
डाव घोषित करण्याचा सल्ला
जडेजा ज्या पद्धतीने फलंदाजी करत होता आणि शमी त्याला साथ देत होता, त्यावरून तो काही षटकांत पहिले द्विशतक झळकावेल असे वाटत होते, पण तसे झाले नाही. अशा स्थितीत दिवसाचा खेळ संपल्यावर जडेजाला याबाबत प्रश्न विचारला असता, त्याने सांगितले की, प्रत्यक्षात ही त्याचीच सूचना होती.
जडेजा म्हणालास “मी त्यांना (संघाला) सांगितले की खेळपट्टीवर ‘व्हेरिएबल बाउन्स’ आहे आणि चेंडू वळू लागले आहेत. म्हणून मी ड्रेसिंग रुममध्ये मेसेज पाठवला की खेळपट्टीवरून गोलंदाजांना मदत मिळू शकते आणि मी सुचवले की आपण त्यांना (श्रीलंकेला) आता फलंदाजीसाठी आमंत्रित केले पाहिजे.”
जडेजाने कपिल देव यांचा रेकॉर्ड मोडला
रवींद्र जडेजाने मोहाली कसोटीच्या दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात शतक पूर्ण केले, जे त्याच्या कसोटी कारकिर्दीतील दुसरे शतक होते. यानंतर, त्याने दुसऱ्या सत्रातही आपली शानदार फलंदाजी सुरू ठेवली आणि डाव घोषित होण्यापूर्वी 175 धावा केल्या, जी त्याच्या कारकिर्दीतील सर्वात मोठी खेळी तर ठरलीच पण 36 वर्ष जुना विक्रमही त्याने मोडीत काढला. जडेजा सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आला आणि कसोटी क्रिकेटमध्ये सातव्या क्रमांकावर फलंदाजी करताना भारतासाठी सर्वात मोठी खेळी करण्याचा विक्रम आपल्या नावे केला. त्याच्या आधी हा विक्रम कपिल देव यांच्या नावावर होता, ज्यांनी 1986 मध्ये श्रीलंकेविरुद्ध 7 व्या क्रमांकावर खेळताना 163 धावा केल्या होत्या.
इतर बातम्या
IND vs SL: रोहितने विराटला मैदानात दिला असा खास सन्मान, जे बोलला ते करुन दाखवलं, पहा VIDEO
IND vs PAK, Women’s World Cup 2022: भारत-पाकिस्तानमध्ये महामुकाबला, विजयासाठी होणार भीषण संग्राम