Icc : पुन्हा बुमराह विरुद्ध पॅट कमिन्स आमनेसामने, आयसीसीची घोषणा
Jasprit Bumrah vs Pat Cummins : क्रिकेट चाहत्यांना पुन्हा एकदा जसप्रीत बुमराह आणि पॅट कमिन्स या दोन्ही तोडीसतोड खेळाडूंमध्ये सामना पाहायला मिळणार आहे. या कसोटीत कोण जिंकणार? याकडे साऱ्यांचंच लक्ष असणार आहे.
बॉर्डर गावसकर ट्रॉफीत टीम इंडियाचा पराभव झाला. ऑस्ट्रेलियाने 5 सामन्यांची मालिका 3-1 अशा फरकाने जिंकली. ऑस्ट्रेलियाने तब्बल 10 वर्षांनंतर बॉर्डर गावसकर ट्रॉफी जिंकली. पॅट कमिन्स याच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाने ही कामगिरी केली. तसेच टीम इंडियाने रोहित शर्मा याच्या अनुपस्थितीत जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वात विजयी सुरुवात करत मालिकेत आघाडी घेतली होती. त्यानंतर रोहितने 3 सामन्यात नेतृत्व केलं. टीम इंडियाला 3 पैकी 2 सामने गमवावे लागले तर 1 सामना बरोबरीत राहिला. कर्णधार आणि बॅटिंगने फ्लॉप ठरल्याने रोहितने सिडनीतील अंतिम कसोटीतून स्वत:ला दूर ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पुन्हा एकदा बुमराहला नेतृत्वाची धुरा मिळाली.
बुमराहने टीम इंडियाला अप्रतिम सुरुवात करुन दिली. मात्र दुसऱ्या बाजूला साथ न मिळाल्याने बुमराहला त्याच्या नेतृत्वात टीम इंडियाला विजयाने शेवट करुन देण्यात अपयश आलं. टीम इंडियाला सिडनीतील पराभवासह मालिकाही गमवावी लागली. बुमराहने या संपूर्ण मालिकेत गोलंदाज, कर्णधार आणि निर्णायक क्षणी बॅटिंगनेही धमाका केला. पॅट कमिन्सनेही त्याची छाप सोडली. आयसीसीने या दोघांच्या कामगिरीची दखल घेतली आहे. त्यामुळे या दोघांमध्ये पुन्हा एकदा क्रिकेट चाहत्यांना रस्सीखेच पाहायला मिळणार असल्याचं आयसीसीने जाहीर केलं आहे.
आयसीसीने नेहमीप्रमाणे यंदाही ‘डिसेंबर प्लेअर ऑफ द मंथ’ या पुरस्कारासाठी तिघांना नामांकन दिलं आहे. या तिघांमध्ये जसप्रीत बुमराह, पॅट कमिन्स यांच्यासह दक्षिण आफ्रिकेच्या डेन पीटरसन याचा समावेश आहे. आयसीसी एका महिन्यातील कामगिरीच्या आधारावर 3 खेळाडूंना ‘बेस्ट प्लेअर ऑफ मंथ’ या पुरस्कारासाठी नामांकन देतं. त्यानंतर क्रिकेट चाहत्यांच्या मतांच्या आधारावर आणि कामगिरीच्या जोरावर तिघांपैकी विजयी खेळाडूचं नाव जाहीर केलं जातं. आयसीसीने सोशल मीडियावर प्रसिद्धपत्रक जाहीर करत तिघांना नामांकन दिल्याची घोषणा केली आहे.या तिन्ही खेळाडूंची डिसेंबर महिन्यातील कामगिरी कशी राहिली? हे जाणून घेऊयात.
जसप्रीत बुमराहची डिसेंबरमधील कामगिरी
जसप्रीत बुमराहने डिसेंबर महिन्यात बीजीटीतील 3 सामन्यांमध्ये 14.22 च्या सरासरीने 22 विकेट्स घेतल्या. तसेच बुमराहने या संपूर्ण मालिकेत सर्वाधिक 32 विकेट्स घेतल्या. बुमराहला या कामगिरीसाठी ‘मॅन ऑफ द सीरिज’ पुरस्काराने गौरवण्यात आलं. बुमराहने तिसऱ्या सामन्यात आकाश दीपसह चिवट बॅटिंग करत फॉलोऑन टाळण्यात निर्णायक भूमिका बजावली. बुमराहला या कामगिरीसाठी नामांकन मिळालंय.
पॅट कमिन्स
पॅट कमिन्सने कर्णधार, गोलंदाज आणि फलंदाज या तिन्ही आघाड्यांवर आपली छाप सोडली. पॅटने डिसेंबरमध्ये 17.64 च्या सरासरीने एकूण 17 विकेट्स घेतल्या. तर मेलबर्नमध्ये 49 आणि 41 धावांची खेळी केली. तसेच 6 विकेट्स मिळवल्या. आयसीसीने त्याच्या या कामगिरीची दखल घेत हे नामांकन दिलंय.
दोघांत तिसरा
जसप्रीत बुमराह आणि पॅट कमिन्स या दोघांमध्येच पुरस्कारासाठी चुरस असणार, हे सांगण्यासाठी कोणत्याही ज्योतिषीची गरज नाही. मात्र या दोघांमध्ये तिसरा खेळाडूही शर्यतीत आहे. दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेन पीटरसन याला नामांकन मिळालंय. दक्षिण आफ्रिकेने पहिल्यांदाच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये प्रवेश केलाय. डेनचं यात मोठं योगदान आहे. डेनने डिसेंबरमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या 2 कसोटी सामन्यांमध्ये 16.92 च्या स्ट्राईक रेटने 13 विकेट्स घेतल्या आहेत. त्यामुळे डेनला नामांकन मिळालंय.
1 पुरस्कार आणि 3 दावेदार
Three standout pacers have been nominated for ICC Men’s Player of the Month for December 2024 🏏
— ICC (@ICC) January 7, 2025
आता मायबाप क्रिकेट चाहत्यांची मतं आणि कामगिरीच्या निकषांच्या आधारे या तिघांपैकी कुणाला हा पुरस्कार मिळणार? याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.