KBC 15 : सचिन तेंडुलकरला धरून विचारलेल्या ‘त्या’ प्रश्नावर इशान आणि स्मृती मंधाना ‘क्लिन बोल्ड’, शेवटी झालं असं की…
भारतीय क्रिकेटमध्ये मैदान गाजवणारे स्मृती मंधाना आणि इशान किशन यांनी कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी या जोडीने किचकट प्रश्नांचा सामना केला. सचिन तेंडुलकरला अनुसरून एक प्रश्न विचारताच दोघांची भंबेरी उडाली. खूप सारी चर्चा करूनही उत्तर येत नव्हतं अखेर...

मुंबई : इशान किशनने मानसिक थकव्यामुळे दक्षिण अफ्रिका दौऱ्यातून माघार घेतली आहे. गेल्या वर्षभरापासून इशान किशन टीम इंडियासोबत आहे. कधी प्लेइंग इलेव्हनमध्ये, तर कधी डग आऊटमध्ये अशी इशानची स्थिती होती. आता मायदेशी परतलेल्या इशानने क्रिकेटपटू स्मृती मंधानासोबत कौन बनेगा करोडपती कार्यक्रमात हजेरी लावली. केबीसीच्या 15 व्या पर्वात स्पेशल गेस्ट म्हणून कार्यक्रमात भाग घेतला. हॉट सीटवर बसलेल्या इशान आणि स्मृतीने 12 प्रश्नांचा सामना केला आणि 12.5 लाख रुपये जिंकले. 12 वा प्रश्न मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याला अनुसरून होता. त्यानंतर 13 व्य प्रश्नाला दोघांवर गेम सोडण्याची वेळ आली. 12 वा प्रश्न इतका किचकट होता की, भल्याभल्यांची भंबेरी उडाली असती. पण वय वर्ष 40 च्या आसपास असलेल्या क्रीडाप्रेमींनी कॅलक्यूलेशन लावून या प्रश्नाचं सहज उत्तर देता आलं असतं. पण नव्या पिढीच्या क्रीडाप्रेमींना आणि क्रिकेटर्सनं हे गणित सोडवणं तसं कठीण आहे. त्याचा अंदाज स्मृती मंधाना आणि इशान किशनला विचारलेल्या त्या प्रश्नावरून आला.
इशान किशन आणि स्मृती मंधाना यांनी 12 प्रश्नांची अचूक उत्तरं देत 12.5 लाखांची रक्कम जमा केली होती. यानंतर 13 व्या प्रश्न विचारताच त्याना गेम सोडावा लागला. कारण 12 व्या प्रश्नाला सर्व लाईफ लाईन खर्च करण्याची वेळ आली होती. प्रश्न असा होता की, सचिन तेंडुलकरने आपलं पहिलं आंतरराष्ट्रीय शतक केलं तेव्हा कोणत्या भारतीय क्रिकेटपटूने त्या सामन्यात पदार्पण केलं होतं? त्या प्रश्नासाठी चार पर्याय होते. राहुल द्रविड, अनिल कुंबले, सौरव गांगुली आणि जवागल श्रीनाथ असे चार पर्याय होते.
प्रश्न विचारल्यानंतर इशान आणि स्मृती मंधाना यांनी एकमेकांची मतं जाणून घेतली. पण दोघंही आपल्या उत्तरावर ठाम नव्हते. त्यामुळे त्यांनी फोन ऑफ फ्रेंड ही लाईफ लाईन वापरण्याचा निर्णय घेतला. पण ज्या मित्राला फोन लावला त्या मित्राला सुद्धा त्या प्रश्नाचं नीट उत्तर देता आलं नाही. त्यानंतर दोघांनी डबल डिप लाईफ लाईन वापरली. त्यामुळे इशानला उत्तर देण्यासाठी दोन पर्याय मिळाले. पहिल्यांदा इशानने चुकीचं उत्तर दिलं. त्यानंतर दुसरं उत्तर अनिल कुंबले दिलं आणि ते बरोबर ठरलं. तेरावा प्रश्न विचारल्यानंतर दोघांकडे एकही लाईफ लाईन नव्हती त्यामुळे गेम सोडण्याचा निर्णय घेतला.