Vinod Kambli माझ्या मुलासारखा, त्याला त्याच्या पायावर उभा करणार, सुनील गावसकर यांचा निर्धार
Vinod Kambli : भारताचा माजी क्रिकेटपटू आणि सचिनचा लहानपणीचा मित्र विनोद कांबळी याची शारिरीक स्थिती कोणत्याही क्रिकेट चाहत्याला पाहवत नाहीय. कांबळीला आधीसारखा ठणठणीत करण्यासाठी आता 1983 ची टीम सज्ज झाली आहे.
टीम इंडियाने कपिल देव यांच्या नेतृत्वात 1983 साली पहिल्यांदा वर्ल्ड कप जिंकला आणि इतिहास घडवला. आता हीच टीम पुन्हा एकदा एक्टीव्ह झाली आहे. ही दिग्गज टीम इंडिया माजी खेळाडू विनोद कांबळी याच्यासाठी सरसावली आहे. दिग्गज क्रिकेटपटू लिटिल मास्ट अर्थात सुनील गावसकर यांनी याबाबतची माहिती दिलीय. महान प्रशिक्षक रमाकांत आचेकर सरांच्या स्मारकाच्या अनावरणानिमित्ताने विनोद कांबळी आणि सचिन तेंडुलकर या 2 क्रिकेटपटू आणि लहानपणीच्या मित्रांची भेट झाली. या भेटीत विनोद कांबळीची स्थिती साऱ्यांनी पाहिली. त्यानंतर कांबळीच्या तब्येतीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला. त्यानंतर कांबळीला आधीसारखा धडधाकट करण्याचा चंग या 1983 च्या टीमने बांधला आहे.
आचरेकर सरांच्या स्मारक अनावरणाच्या कार्यक्रमात सचिन विनोदच्या दिशेने गेला होता. तेव्हा कांबळी सचिनला उभं राहून मिठी मारण्याचा प्रयत्न करत होता. मात्र कांबळीला निट उभंही राहता आलं नाही. त्यानंतर कांबळीने सरांच्या आठवणीत गाणही म्हटलं. मात्र कांबळी गाणं गाताना अडखळत होता. काही महिन्यांपूर्वी व्हायरल झालेल्या व्हीडिओत कांबळीला निट चालताही येत नव्हतं. त्यांनतर आता अखेर गावसकरांनी कांबळीला पूर्णपणे फिट करणार असल्याचं ठरवलंय.
सुनील गावसकर काय म्हणाले?
“1983 चा संघ युवा खेळाडूंबाबत फार जागृत आहे. कांबळी माझ्यासाठी नातवासारखा आहे, त्याचं वय पाहिलं तर तो मुलाप्रमाणे आहे. आम्ही सर्वच फार चिंतेत असतो, विशेष करुन तेव्हा जेव्हा नशीबही साथ देत नाही. मला मदत हा शब्द मान्य नाही, आमची 1983ची टीम त्याची काळजी घेणार आहोत. आम्ही कांबळीची काळजी घेऊ इच्छितो. त्याला त्याच्या पायावर उभं करण्यासाठी मदत करु इच्छितो. आम्ही हे कसं करणार, हे आम्ही ठरवू. आम्ही त्या सर्व क्रिकेटपटूंची काळजी घेऊ इच्छितो जे संघर्ष करत आहेत”, असं गावसकर स्पोट्स टुडेसोबत बोलताना म्हणाले.
क्रिकेटचा ‘देव’ही सरसावला
दरम्यान दिग्गज माजी कर्णधार कपिल देव यांनीही कांबळीसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. कांबळीला आवश्यक उपचारांसाठी लागणारा संपूर्ण खर्च हा कपिल देव करणार आहेत, अशी माहिती माजी क्रिकेटर बलविंदर संधू यांनी दिली. स्मारक अनावरणाच्या कार्यक्रमाला बलविंदर संधू हे देखील उपस्थित होते.
“स्मारक अनावरणच्या कार्यक्रमानंतर कपिल देव यांनी माझ्याशी संपर्क साधला. त्यानंतर कांबळीसाठी वैद्यकीय उपचारासाठी हवा तेवढा खर्च करणार असल्याचं कपिल देव यांनी म्हटलं. मात्र कांबळीनेही उपचार घेण्याची तयारी ठेवावी”, असं देव यांनी सांगितलं असल्याचं संधूंनी म्हटलं.