‘Dinesh Karthik नशीबवान, तो भारतात जन्मला’, पाकिस्तानचा माजी कॅप्टन टीम इंडियाच्या प्रेमात
यपीएल 2022 पासून दिनेश कार्तिकचे चांगले दिवस सुरु झाले आहेत. वयाच्या 36 व्या वर्षी टी 20 सारख्या क्रिकेटच्या वेगवान फॉर्मेट मध्ये तो भारतीय संघाचा महत्त्वाचा भाग बनलाय.
मुंबई: आयपीएल 2022 पासून दिनेश कार्तिकचे चांगले दिवस सुरु झाले आहेत. वयाच्या 36 व्या वर्षी टी 20 सारख्या क्रिकेटच्या वेगवान फॉर्मेट मध्ये तो भारतीय संघाचा महत्त्वाचा भाग बनलाय. शुक्रवारी विडिंज विरुद्ध पहिल्या टी 20 सामन्यात त्याने 19 चेंडूत 41 धावा फटकावल्या. त्याच्या फलंदाजीच्या बळावर भारताने प्रथम फलंदाजी करताना 190 धावांचा डोंगर उभारला. कार्तिकची फलंदाजी पाहून त्याचं वय झाल्याचं कुठेही दिसत नाहीय. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आगामी टी 20 वर्ल्ड कप मध्ये त्याच्याकडे महत्त्वाचा फिनिशरचा रोल असणार आहे.
पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाला खडे बोल सुनावले
दिनेश कार्तिकचा सध्याचा खेळ पाहून पाकिस्तानचा माजी कर्णधार सलमान बटनेही त्याचं तोंडभरुन कौतुक केलं. दिनेश कार्तिकवर कौतुकाचा वर्षाव करताना सलमान बटने पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाला खडे बोल सुनावले. “दिनेश कार्तिक नशीबवान आहे. त्याचा भारतात जन्म झाला. तो पाकिस्तानात असता, तर या वयात स्थानिक क्रिकेट स्पर्धांमध्येही खेळू शकला नसता” असं बट त्याच्या युटयूब चॅनलवर म्हणाला.
टीम इंडियाच्या प्रेमात
“भारतासाठी त्यांचे युवा खेळाडू चांगलं क्रिकेट खेळतायत. येणाऱ्या पुढच्या काही वर्षांसाठी त्यांनी बेंच स्ट्रेंथचा गांभीर्याने विचार केला आहे. त्यांनी खूप सुंदर संघ बांधलाय. वनडे मध्ये शुभमन गिल खूप प्रभावी वाटला. टी 20 मध्ये दिनेश कार्तिक फिनिशरची भूमिका बजावतोय. दिवसेंदिवस सूर्यकुमार यादवच्या फलंदाजीतही सुधारणा होतेय. श्रेयस अय्यर उपलब्ध आहे. अर्शदीप सिंह चांगली गोलंदाजी करतोय. एकूणच त्यांच्याकडे भरपूर प्रतिभावान खेळाडू आहेत” असं सलमान बट म्हणाला.
रोहित शर्माला दिलं श्रेय
पहिल्या टी 20 मधील आपल्या कामगिरीनंतर कार्तिकने ऑस्ट्रेलियात वर्ल्ड कप उंचावण्याचं लक्ष्य असल्याचं सांगितलं. सध्या संघात जे वातावरण आहे, त्याचं श्रेय त्याने रोहित शर्माला दिलं.