IPL 2022: Umran malik अजून टीम इंडियामध्ये खेळण्यासाठी लायक नाही, मोहम्मद शमीचं मोठं विधान
IPL 2022: बऱ्याच काळानंतर भारतात असा वेगवान गोलंदाज दिसला आहे. पण सगळेच दिग्गज उमरान मलिकबद्दल एक सारखा विचार करत नाहीत.
मुंबई: सनरायजर्स हैदराबादच्या (SRH) उमरान मलिकने (Umran malik) आपल्या वेगवान गोलंदाजीने IPL 2022 स्पर्धेत धुमाकूळ घातला आहे. अनेक दिग्गज फलंदाजांना उमरान मलिकने यंदाच्या सीजनमध्ये पॅव्हेलियनमध्ये पाठवलं आहे. रवी शास्त्रीपासून सुनील गावस्करांपर्यंत माजी क्रिकेटपटू त्याच्या गोलंदाजीने प्रभावित झाले आहेत. आगामी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी त्याची भारतीय संघात निवड होऊ शकते. बऱ्याच काळानंतर भारतात असा वेगवान गोलंदाज दिसला आहे. पण सगळेच दिग्गज उमरान मलिकबद्दल एक सारखा विचार करत नाहीत. टीम इंडियातून खेळणारा स्टार गोलंदाज मोहम्मद शमीला (Mohammed Shami) मात्र उमरान मलिकची वेगवान गोलंदाजी प्रभावित करु शकलेली नाही. मोहम्मद शमी बऱ्याच वर्षांपासून भारतीय संघासाठी खेळतोय. सध्या तो गुजरात टायटन्सकडून आयपीएलमध्ये खेळतोय. अलीकडे शमीला उमरान मलिकबद्दल प्रश्न विचारण्यात आला, त्यावर त्याने “या युवा वेगवान गोलंदाजाला टीम इंडियाकडून खेळण्यायोग्य आणि परिपक्व होण्यासाठी वेळ लागेल” असं म्हटलं. शमीने उमरान मलिक शिवाय मोहसीन खान बद्दलही वक्तव्य केलं.
उमरान मलिकच्या गोलंदाजीबद्दल महत्त्वाचं निरीक्षण
“माझ्या मते उमरानच्या गोलंदाजीत वेग आहे. पण व्यक्तीगत पातळीवर मी फक्त वेगाने प्रभावित होत नाही. तुम्ही 140 किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करु शकत असाल, तर चेंडू रिव्हर्स स्विंग आणि दोन्ही बाजूला फिरवू शकता. एखाद्या फलंदाजाला अडचणीच आणण्यासाठी हे पुरेसं आहे. त्याच्याकडे प्रचंड पेस आहे. पण परिपक्व होण्यासाठी वेळ लागेल. तो जस-जसे सामने खेळल जाईल, तसं गती बरोबर अन्य गोष्टी सुद्धा शिकेल” असं मोहम्मद शमी म्हणाला.
मोहसीन खानला दिला सल्ला
“आयपीएलमध्ये युवा गोलंदाजांना मॅच प्रॅक्टिस मिळतेय. ते सीनियर्स सोबत वेळ घालवतायत. त्यांच्या अनुभवातून शिकत आहेत” असं शमी म्हणाला. मोहसीन खानला मोहम्मद शमीने सल्ला दिला. “मोहसीन माझ्यासोबत सराव करायचा. ते युवा आणि मजबूत गोलंदाज आहे. पण त्याला आपल्या गोलंदाजीवर लक्ष केंद्रीत करावं लागेल. गेमप्लानच्या हिशोबाने स्वत:ला तयार करावं लागेल. शारीरिक आणि मानसिक दृष्टया सक्षम व्हावं लागेल” असं शमीने सांगितलं.