आयपीएल स्पर्धेपूर्वीच भारतीय खेळाडूने घेतला बीसीसीआयशी पंगा, म्हणाला…
आयपीएल 2025 स्पर्धा 22 मार्चपासून सुरु होणार आहे. पण या स्पर्धेपूर्वीच बीसीसीआयच्या एका नियमावर बोट ठेवलं जात आहे. एका भारतीय खेळाडूने थेट बीसीसीआयच्या नियमावर आक्षेप घेतला आहे. त्यामुळे आता पुढे काय होते? याची क्रीडावर्तुळात रंगली आहे.

जगातील सर्वात श्रीमंत लीग म्हणून आयपीएलकडे पाहिलं जातं. या लीगमध्ये खेळता यावं असं अनेक खेळाडूंचं स्वप्न असतं. काही खेळाडूंना संधी मिळते तर काही खेळाडूंना संधी मिळत नाही. आयपीएलसाठी बीसीसीआयची नियमावली आहे. खरं तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेपेक्षा इम्पॅक्ट प्लेयर आणि दोन बाउंसर टाकणं हे नियम वेगळे आहेत. या व्यतिरिक्त खेळाडूंच्या चांगल्या वर्तनासाठी बीसीसीआयने काही कठोर नियमावली आखली आहे. आता या नियमांवर दिल्ली कॅपिटल्सचा वेगवान गोलंदाज मोहित शर्माने बोट दाखवलं आहे. यात खेळाडूंच्या कुटुंबियांना त्यांच्यासोबत टूरवर येण्यास बंदी घातली आहे. बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेतील पराभवानंतर हा नियम घालण्यात आला आहे. मोहित शर्मापूर्वी रनमशिन विराट कोहली याने अप्रत्यक्षरित्या या नियमावर बोट दाखवलं आहे. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना मोहित शर्माने सांगितलं की, खेळाडूंसोबत त्यांचे कुटुंब असलं तर कसं नुकसान होऊ शकतं. काही गोष्टी खेळाडूंच्या हाताबाहेर असतात आणि त्या गोष्टींवर लक्ष केंद्रीत करणं आवश्यक आहे. ज्या गोष्टी आम्ही नियंत्रित करू शकतो.
मोहित शर्माने सांगितलं की, ‘काही गोष्टी आमच्या नियंत्रणात नसतात. पण असं असलं तरी प्रत्येकाचं स्वत:चं मत आहे. पण आपण ज्या गोष्टींवर नियंत्रण ठेवू शकतो त्यावर लक्ष केंद्रित करणे महत्वाचे आहे. कुटुंब सोबत असेल तर कसं काय नुकसान असू शकतं? जर एखादी गोष्ट आपल्या हातात नसेल तर ती तशीच राहू दिली पाहिजे.’ मोहित शर्मा आयपीएलच्या या पर्वात दिल्ली कॅपिटल्ससाठी खेळणार आहे. मागच्या दोन पर्वात मोहित शर्मा गुजरात टायटन्ससाठी खेळला. दिल्लीने कॅपिटल्सने त्याच्यासाठी 2 कोटी 20 लाख खर्च करून संघात घेतलं आहे. मोहित शर्मा डेथ ओव्हर्समध्ये चांगली गोलंदाजी करतो. त्याच्याकडे यॉर्कर आणि स्लोवर चेंडू टाकण्याची उत्तम कला आहे.
दुसरीकडे, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या इनोव्हेशन लॅब इंडियन स्पोर्ट्स समिटमध्ये बोलताना विराट कोहलीने अप्रत्यक्षरित्या या नियमावर बोट ठेवलं होतं. कठीण सामन्यांनंतर कुटुंबाकडे परतणं किती महत्त्वाचं असतं, यावर विराट कोहलीने जोर दिला. विराट कोहली म्हणाला की, ‘जेव्हा तुमच्यासोबत मोठं काही घडतं तेव्हा कुटुंबासोबत असणं किती महत्त्वाचं आहे हे लोकांना समजावून सांगणं खूप कठीण असते.’ कुटुंबाची साथ मिळाल्याने खेळाडूंना जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडता येतात. तसेच सामान्य जीवन जगण्यास मदत होते.