Hardik Pandya : पुढच्यावर्षी IPL 2025 मध्ये हार्दिक पांड्यावर पहिला सामना खेळण्यास बंदी, कारण….
Hardik Pandya : हार्दिक पांड्याला कुठलीही टीम टीममध्ये का ठेवेल? IPL 2024 नंतर हा प्रश्न निर्माण होणं स्वाभाविक आहे. कारण विषय कॅप्टनशिपचा असो, फलंदाजी किंवा गोलंदाजी तिन्ही आघाड्यांवर हार्दिक पांड्या पूर्णपणे अपयशी ठरलाय. त्याशिवाय हार्दिक पांड्याला आता पुढच्यावर्षी पहिला सामना खेळता येणार नाहीय.
मुंबई इंडियन्स आणि हार्दिक पांड्यासाठी यंदाचा सीजन खूप वाईट ठरला. कॅप्टनशिप बदल मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना अजिबात पटलं नाही. त्यांनी हार्दिक पांड्या विरोधात वेळोवेळी आपला संताप दाखवून दिला. वानखेडेवर तसच इतर मैदानात सामना सुरु असताना, हार्दिक पांड्याविरोधात बरच हूटिंग करण्यात आलं. रोहित शर्माचा जयजयकार करताना हार्दिक पांड्याला भरपूर डिवचण्यात आलं. एक खेळाडू म्हणून हार्दिक पांड्यासाठी हे खूप वाईट होतं. हार्दिक पांड्याने गुजरात टायटन्सला डेब्युमध्ये चॅम्पियन बनवलं. मागच्या सीजनमध्ये त्याची गुजरातची टीम उपविजेती ठरली. त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या फ्रेंचायजीने भरपूर अपेक्षेने हार्दिक पांड्याला टीममध्ये घेतलं होतं. पण त्यांच्या पदरी निराशा आली. हार्दिकला कॅप्टन म्हणून खेळाडू म्हणूनही स्वत:च्या लौकीकाला साजेशी कामगिरी करता आली नाही.
हार्दिक पांड्या फलंदाजी, गोलंदाजी दोन्ही आघाड्यावर अपयशी ठरला. 14 सामन्यात फलंदाजी करताना त्याची सरासरी फक्त 18 ची होती. त्याने एकही अर्धशतक झळकवलं नाही. त्याने 14 सामन्यात 13 इनिंगमध्ये फक्त 216 धावा केल्या. गोलंदाजीतही अशीच स्थिती होती. गोलंदाजी करताना 35.18 च्या सरासरीने त्याने फक्त 11 विकेट घेतले. त्याच्या गोलंदाजीची इकॉनमी 10 पेक्षा जास्त होती.
किती लाखाचा दंड?
कॅप्टन म्हणून हार्दिक पांड्या ओव्हर रेट मॅनेज करण्यातही कमी पडला. ओव्हर्सची गती धीमी राखल्याबद्दल त्याच्यावर कारवाई करण्यात आली. IPL 2024 सीजनमध्ये हार्दिककडून ही चूक तीनवेळा झाली. त्यामुळे त्याला 30 लाख रुपयांचा दंड आणि एक मॅच बॅनची शिक्षा ठोठावण्यात आली. त्यामुळे हार्दिक पांड्याला आता पुढच्यावर्षीच्या IPL 2025 च्या सीजनमध्ये पहिला सामना खेळता येणार नाही. आता पुढच्या सीजनसाठी मुंबई इंडियन्सची फ्रेंचायजी त्याला रिटेन करते की नाही हे पहाव लागेल.