WI vs NZ: कसेबसे 4 धावांपर्यंत पोहोचले 5 फलंदाज, दुसऱ्या ODI मध्ये न्यूझीलंडने वेस्ट इंडिजची लावली वाट
WI vs NZ: प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने वेस्ट इंडिजच्या टीमला विजयासाठी 213 धावांचे लक्ष्य दिले. मध्येच आलेल्या पावसामुळे काही वेळासाठी सामना थांबवण्यात आला होता.
मुंबई: न्यूझीलंडने दुसऱ्या वनडे सामन्यात वेस्ट इंडिजवर (WI vs NZ) 50 धावांनी विजय मिळवला. तीन वनडे सामन्यांच्या मालिकेत आता 1-1 बरोबरी झाली आहे. पावसाने (Rain) व्यत्यय आणलेल्या या सामन्यात न्यूझीलंडने वेस्ट इंडिजची (West Indies) हालत खराब केली. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने वेस्ट इंडिजच्या टीमला विजयासाठी 213 धावांचे लक्ष्य दिले. मध्येच आलेल्या पावसामुळे काही वेळासाठी सामना थांबवण्यात आला होता. डकवर्थ लुइसच्या आधारावर हा सामना 41 षटकांचा करण्यात आला. वेस्ट इंडिजला विजयासाठी 212 धावांचे लक्ष्य मिळाले. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजचा डाव 35.3 षटकात 161 धावात आटोपला.
न्यूझीलंडची फ्लॉप फलंदाजी
या सामन्यात न्यूझीलंडचे फलंदाजही फ्लॉप ठरले. ऐलन, डेरली मिचेल आणि मिचेल सेंटनर शिवाय कुठलाही फलंदाज चालला नाही. 7 फलंदाज तर दोन आकडी धावसंख्याही गाठू शकले नाहीत. ऐलन आणि मिचेलच्या इनिंगच्या बळावर न्यूझीलंडला विजय मिळवता आला. ऐलनचे शतक थोडक्यात हुकलं. 96 धावांवर तो होल्डरच्या चेंडूवर बोल्ड झाला. त्याने 7 चौकार आणि 3 षटकार लगावले. मिचेलने 41 धावांच्या इनिंग मध्ये 2 चौकार आणि 2 षटकार लगावले. सेंटनर 26 धावांवर नाबाद राहिला. होल्डरने 24 धावात 3 विकेट घेतल्या. केविन सिंक्लेयरने 41 धावात 4 विकेट घेतल्या. त्यांनी न्यूझीलंडला 212 धावांवर रोखलं.
पावसाने वेस्ट इंडिजचा खेळ बिघडवला
पावसाने वेस्ट इंडिजची लय बिघडवली. एक पाठोपाठ एक कॅरेबियाई फलंदाज माघारी परतले. तळाच्या फलंदाजांनी वेस्ट इंडिजला लज्जास्पद पराभवापासून वाचवलं. टिम साउदी आणि ट्रेंट बोल्टने वेस्ट इंडिजच्या फलंदाजांची हालत खराब करुन टाकली. स्टार फलंदाज काइल मेयर्स, शमराह ब्रुक्स आणि जेसन होल्डर खातही उघडू शकले नाहीत. ब्रेंडन किंग आणि कॅप्टन निकोल्स पूरन यांनी कशाबशा प्रत्येकी 2 धावा केल्या. शाई होप आणि कार्टीने प्रत्येकी 16 धावा केल्या. यानिक कॅरियाने वेस्ट इंडिजकडून सर्वाधिक 52 धावा केल्या. त्याशिवाय अल्जारी जोसेफने 49 रन्स केल्या. साऊदीने 22 धावात 4 विकेट आणि बोल्टने 18 रन्स मध्ये 3 विकेट घेतल्या.