Wriddhiman Saha: ऋद्धीमान साहाच्या आरोपावर राहुल द्रविड यांनी सोडलं मौन, म्हणाले…
विकेटकीपर ऋद्धीमान साहाच्या (Wriddhiman Saha) वक्तव्यावरुन भारतीय क्रिकेटमध्ये नवीन वाद निर्माण झाला आहे. त्याने थेट हेड कोच राहुल द्रविड (Rahul dravid) आणि BCCI अध्यक्ष सौरव गांगुली यांच्यावर निशाणा साधला.
कोलकाता: विकेटकीपर ऋद्धीमान साहाच्या (Wriddhiman Saha) वक्तव्यावरुन भारतीय क्रिकेटमध्ये नवीन वाद निर्माण झाला आहे. त्याने थेट हेड कोच राहुल द्रविड (Rahul dravid) आणि BCCI अध्यक्ष सौरव गांगुली यांच्यावर निशाणा साधला. संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी मला निवृत्ती घेण्याचा सल्ला दिला होता, असं खळबळजनक वक्तव्य साहाने केलं. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांच्याबद्दलही साहाने असंच वक्तव्य केलं. मी बीसीसीआयमध्ये असेपर्यंत संघातील तुझ्या स्थानाला धोका नाही, असा सौरव गांगुलींनी आपल्याला मेसेज केल्याचा दावा ऋद्धीमान साहाने केला. साहाच्या या वक्तव्यावर आता हेड कोच राहुल द्रविड यांनी त्यांची बाजू सांगितली आहे. ऋद्धीमान साहाने खासगी संवाद जाहीर केला, असला तरी त्यावर मी अजिबात दु:खी नाहीय, असं राहुल द्रविड यांनी म्हटलं आहे.
मला अजिबात वाईट वाटलेलं नाही
श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 आणि कसोटी मालिकेसाठी शनिवारी संघ जाहीर झाला. त्यानंतर हा सर्व वाद निर्माण झाला. निवड समितीने श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी संघात मोठे बदल केले आहेत. अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, ऋद्धीमान साहा आणि इशांत शर्मा यांना डच्चू दिला आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतर राहुल द्रविड यांनी ऋद्धीमान साहाशी चर्चा करताना त्याला निवृत्तीचा विचार करण्याचा सल्ला दिला होता. “ऋद्धीमानच्या वक्तव्याचं मला अजिबात वाईट वाटलेलं नाही. भारतीय क्रिकेटमध्ये ऋद्धीमानचं योगदान आणि त्याच्या कामगिरीचा मला आदर आहे. भविष्याबद्दल त्याला स्पष्टता असली पाहिजे, असं मला प्रामाणिकपणे वाटतं” असं राहुल द्रविडने सांगितलं.
असा अवघड संवाद साधावा लागतो
“मी जे खेळाडूंना म्हणतोय, ते त्यांना आवडो अथवा न आवडो, पण मी त्यांच्याशी असा संवाद साधत राहीन” असं द्रविडने स्पष्ट केलं. मी जे म्हणतो त्याच्याशी खेळाडू नेहमीच सहमत असतील, असं नाही. खेळाडूंबरोबर काही वेळेला तुम्हाला असा अवघड संवाद साधावा लागतो, असं द्रविड म्हणाला. “सामन्यासाठी संघ निवडतानाही मी खेळाडूंबरोबर असाच संवाद साधतो. संघात ते का खेळत नाहीयत, हा प्रश्न विचारला पाहिजे. खेळाडू नाराज होणं, त्यांना वाईट वाटण स्वाभाविक आहे” असं द्रविड म्हणाला.
Not hurt by Wriddhiman Saha’s comments but he deserved honesty and clarity about his position Rahul Dravid