वनडे क्रिकेटमध्ये नव्या चेंडूबाबतच्या निर्णयात होणार बदल! जाणून घ्या कसं आणि काय ते
वनडे क्रिकेटमध्ये एक मोठा बदल होण्याची शक्यता आहे. दुबईत आयसीसी क्रिकेट कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीत सौरव गांगुली आणि जय शाह उपस्थित होते. वनडे क्रिकेट बदल करण्यासाठी या समितीने एक प्लान आखला आहे. यामुळे वनडे क्रिकेटमध्ये गोलंदाजांना फायदा होणार आहे.
क्रिकेट विश्वात सध्या फक्त टी20 क्रिकेटचा बोलबाला आहे. शॉर्ट फॉर्मेटची लोकप्रियता गेल्या काही वर्षात वाढली आहे. त्यामुळे टी20 मालिका असो की टी20 लीग एका पाठोपाठ होत आहेत. त्यामुळे वनडे क्रिकेटची स्थिती काहीशी नाजूक झाली आहे. 60 षटकांवरून वनडे क्रिकेट 50 षटकांवर आलं खरं पण त्यातही क्रीडाप्रेमींचा कल कमी झाल्याचा दिसत आहे. त्यामुळे वनडे क्रिकेटला नवसंजीवनी देण्यासाठी आयसीसीने कंबर कसली आहे. आयसीसीच्या क्रिकेट कमिटीने काही मोठे बदल करण्यासाठी पावलं उचलली आहेत. दुबईत आयसीसी क्रिकेट कमिटीची बैठक पार पडली या बैठकीत एका सुरात वनडे क्रिकेटमधील एक नियम बदलण्याची मागमी केली गेली. त्यामुळे फॉर्मेटमध्ये मोठा बदल होणार आहे. या आयसीसी क्रिकेट कमिटीत सौरव गांगुली, महेला जयवर्धने, व्हीव्हीएस लक्ष्मण, शॉन पॉलक, डॅनियल विटोरी, रॉजर हार्पर आणि जय शाह होते. या दिग्गजांनी वनडेत फक्त 25 षटकांपर्यंत 2 नवे चेंडू देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. त्यानंतर पुढच्या 25 षटकांपर्यंत एकच चेंडूचा वापर केला जाईल.
सध्या वनडे क्रिकेटमध्ये 50 षटकांपर्यंत दोन्ही बाजूने नव्या चेंडूचा वापर करण्याची परवानगी आहे. 50 षटकांपर्यंत कधीही दोन चेंडू वापरू शकतो. त्यामुळे फलंदाजांना फायदा होत होता आणि गोलंदाजांना चांगलाच घाम फुटला होता. हा प्रस्ताव आयसीसी कमिटीने सर्व कर्णधारांना पाठवला आहे. कर्णधारांच्या सहमतीनंतर हा नियम लागू केला जाईल. वनडे क्रिकेटमध्ये फक्त 25 षटकांपर्यंत दोन चेंडू वापरण्याची परवानगी मिळाली तर गोलंदाजांना फायदा होईल. सामन्यात रिव्हर्स स्विंग पाहायला मिळेल, तसेच लेग स्पिनर्संनाही फायदा होईल.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्येही बदल करण्यासाठी शिफारस
आयसीसीच्या क्रिकेट कमिटीने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये बदल करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. सायकलमध्ये आता तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळावी असा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. दक्षिण अफ्रिका, न्यूझीलंड आणि श्रीलंका हे संघ दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळतात. तर भारत, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया मोठ्या मालिका खेळतात. त्यामुळे कसोटी क्रिकेटचं नुकसान होत असल्याचं सांगितलं जात आहे. त्याचबरोबर डे नाईट कसोटी क्रिकेट खेळण्यावरही जोर देण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियातच फक्त पिंक बॉल टेस्ट खेळली जाते. बीसीसीआयने मागच्या दोन वर्षात पिंक बॉल कसोटीचं आयोजन केलेलं नाही हे विशेष..