Joe Root : जो रुटचा कारनामा, पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात ऐतिहासिक कामगिरी
Pakistan vs England 1st Test : जो रुट पाकिस्तान विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात 32 धावांवर नाबाद आहे. रुटने या खेळी दरम्यान इतिहास घडवला आहे. जाणून घ्या इंग्लंडच्या फलंदाजाने नक्की काय केलंय.
इंग्लंडचा अनुभवी फलंदाज आणि माजी कर्णधार जो रुट हा गेल्या अनेक वर्षांपासून कसोटी क्रिकेटमध्ये सातत्याने उल्लेखनीय कामगिरी करत आहे. रुटने नुकत्याच मायदेशात श्रीलंकेविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत अनेक रेकॉर्ड केले. आता इंग्लंड पाकिस्तान दौऱ्यात कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळत आहे. रुटने या सामन्यातील दुसऱ्या दिवशी ऐतिहासिक कामगिरी केली आहे. ओली पोप झिरोवर आऊट झाल्यानंतर जो रुट बेन डकेट याला दुखापत असल्याने तिसऱ्या स्थानी बॅटिंगसाठी आला.
पाकिस्तानने पहिल्या डावात ऑलआऊट 556 धावा केल्या. तर इंग्लंडने प्रत्युत्तरात दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 1 विकेट गमावून 96 धावा केल्या आहेत. जो रुट आणि झॅक क्रॉली या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी 92 धावांची नाबाद भागीदारी केली आहे. झॅक क्रॉली 64 आणि जो रुट 32 धावांवर नाबाद आहेत. रुटने या खेळीसह मोठा विक्रम केला आहे. रुट वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेच्या इतिहासात असा कारनामा करणारा पहिलाच फलंदाज ठरला आहे.
रुटची ऐतिहासिक कामगिरी
जो रुटने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये 5 हजार धावांचा टप्पा गाठला आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये जो रुटच्या आसपासही कुणी नाही. रुटने 107 डावांमध्ये 51.59 च्या सरासरीने 16 शतकं आणि 20 अर्धशतकांच्या मदतीने 5 हजार धावा पूर्ण केल्या आहेत.
WTC इतिहासात सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
- जो रुट, 59 सामने, 5 हजार 5 धावा, 16 शतकं 20 अर्धशतकं
- मार्नस लबुशेन, 45 सामने, 3 हजार 904 धावा, 11 शतकं 19 अर्धशतकं
- स्टीव्हन स्मिथ, 45 सामने, 3 हजार 486 धावा, 9 शतकं 16 अर्धशतकं
- बेन स्टोक्स, 48 सामने, 3 हजार 101 धावा, 7 शतकं 16 अर्धशतकं
- बाबर आझम, 32 सामने, 2 हजार 755 धावा, 8 शतकं 15 अर्धशतकं
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची सुरुवात 2019 साली झाली. जो रुट तेव्हाही सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज होता. तेव्हा रुटने 1 हजार 660 धावा केल्या होत्या. तेव्हा रुट मार्नस लबुशेनपेक्षा 15 धावांनी पिछाडीवर होता. रुट 2021-2023 या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप साखळीत 1 हजार 915 धावांसह अव्वल ठरला. तसेच रुट सध्याच्या सुरु असलेल्या तिसऱ्या साखळीत 1 हजार 430 धावांसह पहिल्या स्थानी आहे. रोहितने आतापर्यंत या स्पर्धेच्या इतिहासातील 34 सामन्यांमध्ये 2 हजार 594 धावा केल्या आहेत. रोहित या स्पर्धेतील इतिहासात सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत 8 व्या स्थानी आहे.
पाकिस्तान प्लेइंग ईलेव्हन : शान मसूद (कॅप्टन), सॅम अयुब, अब्दुल्ला शफीक, बाबर आझम, सौद शकील, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), आगा सलमान, आमेर जमाल, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह आणि अबरार अहमद.
इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन : ऑली पोप (कॅप्टन), झॅक क्रॉली, बेन डकेट, जो रूट, हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ (विकेटकीपर), ख्रिस वोक्स, गस एटकिन्सन, ब्रायडन कार्स, जॅक लीच आणि शोएब बशीर.