PAK vs NZ : टी20 संघाची धुरा हाती घेताच शाहीन आफ्रिदीने बाबरला सुनावलं, सामन्याच्या निकालानंतर स्पष्टचं सांगितलं की…
न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका सुरु झाली आहे. पहिल्याच सामन्यात पाकिस्तानला पराभवाचं तोंड पाहावं लागलं. न्यूझीलंडने पाकिस्तानचा 46 धावांनी पराभव केला. या पराभवामुळे शाहीन आफ्रिदीच्या कर्णधारपदाला पहिलाच डाग लागला आहे. त्यामुळे त्याने सामन्यानंतर आपला संताप व्यक्त केला.
मुंबई : टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धा डोळ्यासमोर ठेवून पाकिस्तान संघात मोठी उलथापालथ पाहायला मिळाली. टी20 संघाची धुरा शाहीन आफ्रिदीकडे सोपवण्यात आली. शाहीन आफ्रिदीच्या नेतृत्वात न्यूझीलंडविरुद्ध पहिल्यांदाच टी20 मालिका खेळत आहे. पण पहिल्याच सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं. पाकिस्तानने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. न्यूझीलंडने 20 षटकात 8 गडी गमवून 226 धावा केल्या. विजयासाठी 227 धावांचं आव्हान पाकिस्तानसमोर ठेवलं. पाकिस्तानचा संघ 18 षटकात सर्व गडी गमवून 180 धावा करू शकला. पाकिस्तानला 46 धावांनी पराभव सहन करावा लागला. न्यूझीलंडला मोठी धावसंख्या उभारून देण्यात केन विल्यमसनचा मोठा हातभार होता. केन विल्यमसनने 42 चेंडूत 57 धावांची खेळी केली. पण यासाठी पाकिस्तानचं क्षेत्ररक्षण कारणीभूत ठरलं. विल्यमसनचे दोन सोपे झेल सोडले त्यामुळे न्यूझीलंडच्या धावांमध्ये भर पडली. यामध्ये बाबर आझम आणि इफ्तिखार अहमदचं नाव येतं. सामन्याचा निकाल लागल्यानंतर कर्णधार शाहीन अफ्रिदीने सर्वांसमोर खडे बोल सुनावले.
“संघाचे नेतृत्व करण्याचा अभिमानाचा क्षण आहे. कोणत्याही खेळाडूला आपल्या देशाचे नेतृत्व करण्याचा अभिमान वाटतो. पुढच्या सामन्यांमध्ये आम्ही आमचे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करू. विल्यमसन आणि मिशेल यांची चांगली खेळी केली. आम्ही ते झेल सोडले नसते तर सामन्याचा निकाल वेगळा असता. आता त्यावर काम करायला हवे.”, असं सांगत अप्रत्यक्षरित्या बाबर आणि इफ्तिखार अहमदला सुनावलं. न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात दुसरा टी20 सामना सेडॉन पार्कमध्ये 14 जानेवारीला होणार आहे.
दोन्ही संघाचे खेळाडू
पाकिस्तान संघ: मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), बाबर आझम, फखर जमान, सइम अयुब, इफ्तिखार अहमद, आझम खान, आमेर जमाल, मोहम्मद नवाज, शाहीन आफ्रिदी (कर्णधार), हरिस रऊफ, जमान खान, उसामा मीर, मोहम्मद वसीम जूनियर, अबरार अहमद, साहिबजादा फरहान, अब्बास आफ्रिदी, हसीबुल्ला खान.
न्यूझीलंड संघ: डेव्हॉन कॉनवे, फिन ऍलन, केन विल्यमसन (कर्णधार), मार्क चॅपमन, ग्लेन फिलिप्स, डॅरिल मिशेल, टिम सेफर्ट (विकेटकीपर), मिचेल सँटनर, टिम साऊदी, इश सोधी, मॅट हेन्री, एडम मिल्ने, बेन सियर्स