PAK vs SL | श्रीलंका Asia Cup 2023 Final मध्ये, पाकिस्तानवर 2 विकेट्सने सनसनाटी विजय
Pakistan vs Sri Lanka Asia Cup 2023 | श्वास रोखून धरायला लावणाऱ्या सामन्यात श्रीलंकेने पाकिस्तानवर 2 विकेट्सने सनसनाटी विजय मिळवला आहे. तर पराभवामुळे पाकिस्तानचा सुपडा साफ झाला आहे.
कोलंबो | शेवटच्या बॉलपर्यंत रंगलेल्या सामन्यात श्रीलंकेने पाकिस्तानवर 2 विकेट्सने विजय मिळवला आहे. पाकिस्तानने श्रीलंकेला विजयासाठी डकवर्थ लुईस नियमानुसार 42 ओव्हरमध्ये 252 धावांचं आव्हान दिलं होतं. पाकिस्तान आणि श्रीलंका या दोन्ही संघांनी या सामन्यात अखेरच्या बॉलपर्यंत चांगलीच लढत दिली. मात्र अखेरच्या बॉलवर श्रीलंकेने बाजी मारली आणि पाकिस्तानचं पॅकअप केलं. श्रीलंकेला विजयासाठी शेवटच्या बॉलवर 2 धावांची गरज होती.तेव्हा चरिथा असलंका याने जमान खान याच्या बॉलवर 2 धावा घेत श्रीलंकेला विजय मिळवून दिला. श्रीलंकेने या विजयासह आशिया कप 2023 च्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात धडक मारली आहे. आता 17 सप्टेंबरला टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका यांच्यात फायनलमध्ये लढत होणार आहे.
श्रीलंका अशी जिंकली
श्रीलंकेकडून ओपनर पाथुम निसांका याने 29 आणि कुसल परेरा याने 17 धावा केल्या. वनडाऊन आलेल्या कुसल मेंडीस याने सर्वाधिक 91 धावांची खेळी केली. कुसलच्या या खेळीने श्रीलंकेच्या विजयाचा पाया रचला. सदीरा समरविक्रमा याने 48 रन्सचं योगदान दिलं. मात्र त्यानंतर कॅप्टन दासून शनाका 2, धनंजया डी सिल्वा 5, दुनिथ वेल्लालागे 0 आणि प्रमोद मधूशन याने 1 रन केला. हे चौघे झटपट बाद झाल्याने सामना रंगतदार स्थितीत पोहचला.
श्रीलंकेचा थरारक विजय
What a thrilling victory!
Sri Lanka secures a spot in the #AsiaCup2023 finals on Sunday with a thrilling 2-wicket win over Pakistan!#AsiaCup2023 #SLvPAK pic.twitter.com/lJF3CCNjPK
— Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) September 14, 2023
मात्र चरिथ असलंका याने एक बाजू लावून धरली होती. सामना 42 व्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलपर्यंत पोहचला. विजयासाठी 2 धावांची गरज असताना चरिथाने 2 धावा काढून टीमला विजय मिळवून दिला. चरिथाने नाबाद 49 धावांची नाबाद खेळी केली. तर मथीशा पथीराने झिरोवर नाबाद परतला. पाकिस्तानकडून इफ्तिखार अहमद याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. शाहीन अफ्रिदी याने 2 तर शादाब खान याने 1 विकेट घेतली.
त्याआधी पाकिस्तानने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. पाकिस्तानने शफीक याच्या 52,मोहम्मद रिझवान याच्या नाबाद 86 आणि इफ्तिखार अहमद याच्या 47 धावांच्या जोरावर 42 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 252 धावा केल्या. या तिघांव्यतिरिक्त एकालाही तिशीपार मजल मारता आली नाही. श्रीलंकेकडून मथीथा पथीराणा याने 3, प्रमोद मधुशन याने 2 आणि महीश थेक्षणा-दुनिथ वेललागे या जोडीने 1-1 विकेट घेतली.
पाकिस्तान प्लेईंग ईलेव्हन | बाबर आझम (कॅप्टन), फखर झमान, अब्दुल्लाह शफीक, मोहम्मद रिजवान (विकेटकीपर), मोहम्मद हरिस, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, मोहम्मद वसीम जूनियर, शाहीन शाह अफ्रीदी आणि जमान खान.
श्रीलंका प्लेईंग ईलेव्हन | दासुन शानाका (कर्णधार), पाथुम निसांका, कुसल परेरा, कुसल मेंडिस (विकेटकीपर), सदीरा समरविक्रमा, चारिथ असालंका, धनंजया डी सिल्वा, दुनिथ वेललागे, महेश थेक्षाना, प्रमोद मदुशन आणि मथीशा पाथिराना.