टीम इंडियाला भिडण्याआधी पाकिस्तानचं ‘शक्ती प्रदर्शन’, फक्त 92 रन्स बनवूनही जिंकला सामना
कॉमनवेल्थ गेम्स (commonwealth games 2022) आधी पाकिस्तानी संघ दमदार प्रदर्शन करतोय. पाकिस्तानचा संघ आयर्लंड मध्ये तिरंगी मालिका खेळतोय.
मुंबई: कॉमनवेल्थ गेम्स (commonwealth games 2022) आधी पाकिस्तानी संघ दमदार प्रदर्शन करतोय. पाकिस्तानचा संघ आयर्लंड मध्ये तिरंगी मालिका खेळतोय. आयर्लंड आणि ऑस्ट्रेलिया (Australia) हे संघ सुद्धा या मालिकेमध्ये आहेत. तिसऱ्या सामन्यात पाकिस्तानने यजमान आयर्लंड विरुद्ध (PAK vs IRE) फक्त 92 धावा केल्या. मात्र तरीही पाकिस्तानने विजय मिळवला. मंगळवारी हा सामना झाला. पाकिस्तानने 14 षटकात 92 धावा केल्या. प्रत्युत्तरात आयर्लंडचा संघ 14 षटकात 83 धावा करु शकला. पावसामुळे 6-6 षटकं कमी करण्यात आली. डकवर्थ लुईस नियमाच्या आधारावर सामन्याचा निर्णय घेण्यात आला.
पाकिस्तानची खराब सुरुवात
पाकिस्तानी संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरला. त्यांची सुरुवात खराब झाली. इरम जावेद पहिल्याच चेंडूवर आऊट झाली. कॅप्टन मरुफने 25 चेंडूत 13 धावा केल्या. विकेटकीपर मुनीबा अलीने 24 चेंडूत 29 धावा फटकावल्या. निदा दारने शेवटच्या षटकात 15 चेंडूत 26 धावा केल्या. तिने 3 चौकार आणि एक षटकार लगावला.
आयर्लंडचा संघ चांगल्या सुरुवातीनंतरही हरला
आयर्लंडच्या सलमीवीर रेबेका स्टोकेल आणि गॅबी लुईसने चांगली सुरुवात करुन दिली. दोघींनी 55 धावांची भागीदारी केली. पण तुबा हसनने स्टोकेलला बाद करताच आयर्लंडच्या संघाचा पराभवाच्या दिशेने प्रवास सुरु झाला. ओर्लाने 10 धावा केल्या. कॅप्टन लॉरा डेनली 1 रन्सवर आऊट झाला. मॅरी वालड्रोन खातही उघडलं नाही. डावाच्या अखेरीस आयर्लंडच्या संघाला 14 षटकात फक्त 83 धावा करता आल्या.
तिरंगी मालिकेवर भारताची नजर
पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया आणि आयर्लंड मध्ये सुरु असलेल्या या तिरंगी मालिकेवर टीम इंडियाची नजर आहे. कॉमनवेल्थ गेम्स मध्ये भारतीय संघाचा या दोन संघांविरुद्ध सामना होणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया मध्ये 28 जुलैला आणि 31 जुलैला पाकिस्तान विरुद्ध खेळणार आहे. या तिरंगी मालिकेतील ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान सामना पावसामुळे होऊ शकला नाही. आता 21 जुलैला दोन्ही संघ भिडतील.