IND vs SA: दक्षिण आफ्रिकेच्या तीन खेळाडूंपासून टीम इंडियाला सर्वात जास्त धोका, केएल राहुलला सावध रहाण्याची गरज
IND vs SA: दक्षिण आफ्रिकेचा संघ भारतात दाखल झाला आहे. गुरुवारी सकाळी दक्षिण आफ्रिकेचा संघ भारतात दाखल झाला. मायभूमीतच भारताला हरवण्याच्या उद्देशाने दक्षिण आफ्रिकेचा संघ भारतात दाखल झालाय.
मुंबई: IPL 2022 चा सीजन संपला आहे. क्रिकेट चाहते आता, टीम इंडियाच्या (Team India) आंतरराष्ट्रीय सामन्यांची आतुरतेने वाट पाहत आहेत. ही प्रतिक्षा येत्या 9 जून रोजी संपणार आहे. भारताची दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (India vs South Africa) पाच टी 20 सामन्यांची मालिका सुरु होणार आहे. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवरुन या संग्रामाला सुरुवात होणार आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ भारतात दाखल झाला आहे. गुरुवारी सकाळी दक्षिण आफ्रिकेचा संघ भारतात दाखल झाला. मायभूमीतच भारताला हरवण्याच्या उद्देशाने दक्षिण आफ्रिकेचा संघ भारतात दाखल झालाय. दक्षिण आफ्रिकेचा संघ बलवान आहे. आपले सर्व अव्वल खेळाडू दक्षिण आफ्रिकेने भारत दौऱ्यावर पाठवले आहेत. तेच, दुसऱ्याबाजूला भारताच्या सीनियर खेळाडूंना विश्रांती देण्यात आलीय. आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करणारे युवा चेहरे या मालिकेत खेळताना दिसतील. दक्षिण आफ्रिकेचे 16 चे 16 खेळाडू टॅलेंटेड आहेत. भारतीय संघाला पराभूत करण्याची त्यांची क्षमता आहे. केएल राहुलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाला सावध रहाण्याची आवश्यकता आहे.
वर्ल्ड रेकॉर्ड पासून रोखण्याचं लक्ष्य
भारताला वर्ल्ड रेकॉर्ड बनवण्यापासून रोखण्याचं दक्षिण आफ्रिकेसमोर आव्हान असेल. टी 20 वर्ल्ड कप नंतर भारतीय संघाने आतापर्यंत सलग 12 टी 20 सामने जिंकले आहे. आता 13 वा सामना जिंकून वर्ल्ड रेकॉर्ड बनवण्याची के एल राहुलच्या संघाकडे संधी आहे.
कॅप्टन टेंबा बावुमा काय म्हणाला?
“यावर्षी T 20 वर्ल्ड कप होणार आहे. त्या तयारीच्या दृष्टीने भारताविरुद्धची मालिका एक चांगली संधी आहे. आम्ही जिंकण्याचा आणि टी 20 मध्ये सर्वाधिक विजयाचा वर्ल्ड रेकॉर्ड बनवण्यापासून भारताला रोखण्याचा प्रयत्न करु” असं टेंबा बावुमा म्हणाला.
तीन खेळाडूंपासून सर्वात जास्त धोका
दक्षिण आफ्रिकेचा संघ पूर्ण जोशात आहे. यावर्षीच दक्षिण आफ्रिकेने मायदेशात झालेल्या वनडे मालिकेत भारताला 3-0 ने हरवलं होतं. दक्षिण आफ्रिकेच्या तीन खेळाडूंनी आयपीएल 2022 मध्ये कमालीच्या फॉर्म दाखवला. लखनौ सुपर जायंट्सकडून सलामीला येणाऱ्या क्विंटन डि कॉकने या सीजनमध्ये 508 धावा फटकावल्या. कोलकाता विरुद्ध त्याने नाबाद 140 धावा ठोकल्या. डेविड मिलरने 70 च्या सरासरीने 481 धावा फटकावल्या. फिनिशर म्हणून मिलरने गुजरात टायटन्सला अनेक सामन्यात विजय मिळवून दिला. सनरायजर्स हैदराबादकडून खेळणाऱ्या एडन मार्करामने 47 पेक्षा जास्त सरासरीने 12 सामन्यात 381 धावा फटकावल्या. दक्षिण आफ्रिकेचे हे तीन खेळाडू भारतीय वातावरणात रुळले असून त्यांना खेळपट्टीचीही कल्पना आली आहे. त्यामुळे ते भारताविरुद्ध धोकादायक ठरु शकतात.