Rishabh Pant फ्लॉप असला, तरी फरक पडत नाही, कोच राहुल द्रविड यांचं मोठं विधान
भारत आणि दक्षिण आफ्रिकेमधये (IND vs SA) पाच टी 20 सामन्यांची मालिका झाली. ऋषभ पंतला (Rishabh pant) या सीरीजसाठी कॅप्टन बनवण्यात आलं होतं. शेवटच्या पाचव्या सामन्यावर पावसाने पाणी फिरवलं.
मुंबई: भारत आणि दक्षिण आफ्रिकेमधये (IND vs SA) पाच टी 20 सामन्यांची मालिका झाली. ऋषभ पंतला (Rishabh pant) या सीरीजसाठी कॅप्टन बनवण्यात आलं होतं. शेवटच्या पाचव्या सामन्यावर पावसाने पाणी फिरवलं. त्यामुळे मालिका 2-2 अशी बरोबरीत सुटली. या सीरीजनंतर आता ऋषभ पंतच्या फॉर्म बद्दल प्रश्न विचारले जात आहेत. पंतची बॅट या सीरीजमध्ये तळपली नाही. त्याच्याकडून अपेक्षित धावा झाल्या नाहीत. त्यामुळे क्रिकेटचे जाणकार संघातील त्याच्या स्थानाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत. काहींनी त्याला टी 20 वर्ल्ड कप साठी संघात स्थान द्यायलाही नकार दिला आहे. पण टीमचे हेड कोच राहुल द्रविड (Rahul Dravid) यांचा विचार मात्र पूर्णपणे वेगळा आहे. टी 20 वर्ल्ड कप खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाला जाणाऱ्या भारतीय संघाचा ऋषभ पंत महत्त्वाचा भाग असेल, असं राहुल द्रविड यांनी स्पष्ट केलं आहे.
ऋषभ पंतने फक्त इतक्या धावा केल्या
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सीरीजमध्ये ऋषभ पंतने फक्त 58 धावा केल्या. तसच या सीरीजमध्ये तो एकाच पद्धतीने बाद झाला. या सीरीजसाठी केएल राहुलला कॅप्टन बनवण्यात आलं होतं. पण दुखापतीमुळे तो बाहेर गेल्याने ऋषभ पंतला कॅप्टनशिपची संधी मिळाली. पहिले दोन सामने हरल्यानंतर टीम इंडियाने जबरदस्त कमबॅक केलं. मालिका 2-2 अशी बरोबरीत आणली. पण शेवटचा सामना पावसामुळे होऊ शकला नाही.
पंत आमच्या प्लानिंगचा मोठा भाग
“पुढचे काही महिने ऋषभ पंत आमच्या प्लानिंगचा मोठा भाग आहे” असं राहुल द्रविड सामन्यानंतर पत्रकार परिषदेत म्हणाले. “कोणाबद्दलही एका सीरीजच्या आधारावर निर्णय घेणार नाही” असं राहुल द्रविड म्हणाले. “मधल्या षटकात तुम्हाला असे खेळाडू हवे आहेत, जे आक्रमक क्रिकेट खेळतील. दोन-तीन सामन्यांच्या आधारावर कोणाबद्दलही मत बनवणं कठीण असतं” असं द्रविड यांनी सांगितलं. राहुल द्रविड ऋषभ पंतच्या स्ट्राइक रेटवर खुश आहेत. आयपीएलमध्ये पंतचा स्ट्राइक रेट 158 पेक्षा जास्त आहे. त्याने दिल्ली कॅपिटल्ससाठी 340 धावा केल्या.