RR vs GT : राजस्थान रॉयल्सचा ‘वैभव’शाली विजय, गुजरातचा 8 विकेट्सने धुव्वा
Vaibhav Suryavanshi Century Rajasthan Royals vs Gujarat Titans Match Result : वैभव सूर्यवंशी याने रेकॉर्डब्रेक शतक करत जयपूरच्या सवाई मानसिंह स्टेडियममध्ये इतिहास घडवला. वैभवच्या या खेळीच्या जोरावर राजस्थानने गुजरातवर सहज आणि धमाकेदार विजय मिळवला.

राजस्थान रॉयल्सने 14 वर्षीय वैभव सूर्यवंशी याने केलेल्या ऐतिहासिक शतकी खेळीच्या जोरावर गुजरात टायटन्सवर 8 विकेट्सने धमाकेदार विजय मिळवला आहे. गुजरातने राजस्थानला विजयासाठी 210 धावांचं आव्हान दिलं होत. राजस्थानने हे आव्हान वैभवच्या वादळी खेळीच्या जोरावर सहज पूर्ण केलं. राजस्थानने 25 बॉलआधी आणि 2 विकेट्सच्या मोबदल्यात हे आव्हान सहज पूर्ण केलं आणि एकतर्फी विजय मिळवला. राजस्थानने 15.5 ओव्हरमध्ये 212 धावा केल्या. वैभव सूर्यवंशी व्यतिरिक्त यशस्वी जयस्वाल यानेही विजयात योगदान दिलं. यशस्वीने नाबाद 70 धावा केल्या. तर कर्णधार रियान परागही 32 धावावंर नाबाद परतला. राजस्थानचा हा सलग पाचव्या पराभवानंतर पहिला तर एकूण तिसरा विजय ठरला.
राजस्थानची आक्रमक सुरुवात आणि शतकी भागीदारी
राजस्थानकडून वैभव आणि यशस्वी ही सलामी जोडी मैदानात आली. या सलामी जोडीने पाहता पाहता अर्धशतकी, शतकी आणि दीडशतकी भागीदारी केली. वैभवने या दरम्यान अवघ्या तिसऱ्या सामन्यातच आयपीएलमधील पहिलंवहिलं आणि ऐतिहासित शतक झळकावलं. वैभवने 35 चेंडूत शतक केलं. मात्र त्यानंतर वैभव आऊट झाला. प्रसिध कृष्णा याने वैभवला बोल्ड केलं आणि ही सेट जोडी फोडली. मात्र तोवर राजस्थानच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला होता. वैभव आणि यशस्वी या दोघांनी अवघ्या 71 बॉलमध्ये 166 रन्सची ओपनिंग पार्टनरशीप केली. तर वैभवने 38 चेंडूत 11 षटकार आणि 7 चौकारांच्या मदतीने 265.79 च्या स्ट्राईक रेटने 101 धावा केल्या.
रियान आणि जयस्वालची ‘यशस्वी’ भागीदारी
वैभवनंतर मैदानात आलेला नितीश राणा 4 धावा करुन आऊट झाला. त्यानंतर मैदानात कर्णधार रियान पराग आला. यशस्वी आणि रियान या जोडीने त्यानंतर फटकेबाजी करत राजस्थानला विजयापर्यंत पोहचवलं. यशस्वी आणि रियान या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 41 धावांची नाबाद भागीदारी केली. यशस्वीने 40 चेंडूत 2 षटकार आणि 9 चौकारांच्या मदतीने नाबाद 70 धावा केल्या. तर रियानने 15 बॉलमध्ये 2 सिक्स आणि तेवढ्याच चौकारांच्या मदतीने नाबाद 32 धावांची खेळी केली. तर गुजरातकडून प्रसिध व्यतिरिक्त राशिद खान यानेही एकमेव विकेट घेतली.
राजस्थानचा गुजरातवर हल्लाबोल
Special. Scintillating. Suryavanshi 🙌✨
For his record-smashing 1⃣0⃣1⃣(38), Vaibhav Suryavanshi is adjudged the Player of the Match 🩷
Updates ▶ https://t.co/HvqSuGgTlN#TATAIPL | #RRvGT | @rajasthanroyals pic.twitter.com/RQA5hxmTXE
— IndianPremierLeague (@IPL) April 28, 2025
गुजरातच्या पराभवाची परतफेड
दरम्यान राजस्थानने यासह गुजरातवर मात करत मागील पराभवाचा हिशोब बरोबर केला आहे. राजस्थान आणि गुजरात या दोन्ही संघांची या हंगामात आमनेसामने येण्याची ही दुसरी वेळ होती. याआधी गुजरातने राजस्थानवर 9 एप्रिलला 58 धावांनी विजय मिळवला होता. आता काही दिवसांनी राजस्थानने या पराभवाची परतफेड केली आहे.
