Vishnu Solanki: ड्रेसिंग रुममधूनच त्याने अंत्यसंस्कार पाहिले, दहा दिवसात बाळाला आणि वडिलांना गमावलं, रणजी क्रिकेटपटूचं दु:ख
Vishnu Solanki: बडोद्याचा क्रिकेटपटू विष्णू सोलंकीवर (Vishnu Solanki) दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सध्या विष्णूच्या आयुष्यात सर्वात कठीण काळ सुरु आहे. पण या परिस्थितीतही विष्णूने हिम्मत सोडलेली नाही.
कटक: बडोद्याचा क्रिकेटपटू विष्णू सोलंकीवर (Vishnu Solanki) दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सध्या विष्णूच्या आयुष्यात सर्वात कठीण काळ सुरु आहे. पण या परिस्थितीतही विष्णूने हिम्मत सोडलेली नाही. सर्वप्रथम त्याने आपल्या कर्तव्याला प्राधान्य दिलं. विष्णूला जवळून ओळखणाऱ्या लोकांना त्याच्याबद्दल प्रचंड वाईट वाटतय. पण संघाप्रती त्याची कर्तव्य भावना पाहून ते त्याचं कौतुकही करत आहेत. दहा दिवसात विष्णूने आपल्या आयुष्यातील दोन जवळच्या व्यक्तींना गमावलं आहे. कुठल्याही माणसासाठी जवळच्या व्यक्तीच्या मृत्यूचं (Death) दु:ख पचवणं सोपं नसतं. पण विष्णूने हे आघात सहन करुन चंदीगड विरुद्धच्या रणजी सामन्यात उत्तम व्यावसायिक खेळाचं प्रदर्शन केलं. काल चंदीगड (Baroda vs Chandigarh) विरुद्ध सामना सुरु असताना विष्णूच्या वडिलांच निधन झालं. भुवनेश्वर येथील कटकच्या मैदानावर विष्णू मैदानात क्षेत्ररक्षण करत होता. त्यावेळी बडोदा संघाचे मॅनेजर धर्मेंद्र आरोठे यांनी विष्णूला ड्रेसिंग रुममध्ये बोलावलं व त्याच्या वडिलांच्या निधनाची दु:खद बातमी त्याला सांगितली.
दाखवलेली हिम्मत असाधारण
“विष्णूला ड्रेसिंग रुममध्ये का बोलावलं? ते सुरुवातीला आम्हाला समजलं नाही. पण नंतर त्याच्या वडिलांच निधन झाल्याचं कळलं” असं बडोदे संघाचा कर्णधार केदार देवधरने सांगितलं. “विष्णूने ड्रेसिंग रुमच्या एका कोपऱ्यात बसून वडिलांवर होणारे अंत्यसंस्कार बघितले. पण त्याने जी हिम्मत दाखवली ती खरोखरच असाधारण आहे” असे देवधर म्हणाला.
आम्ही घरी परतण्याचा पर्याय दिला होता, पण….
“विष्णू सोलंकीच्या वडिलांच्या निधनाबद्दल समजल्यानंतर त्याला आम्ही घरी परतण्याचा पर्याय दिला होता. पण त्याने संघासाठी सामना खेळण्याचा निर्णय घेतला. यावरुन त्याची खेळ आणि संघाबद्दलची कटिबद्धता दिसून येते” असे बडोदा क्रिकेट संघटनेचे सचिव अजित लेले म्हणाले. वडिलांचा मृतदेह शवागरात फारवेळ ठेवणं शक्य नव्हतं. त्यामुळे विष्णूच्या मोठ्या भावाने पार्थिवावर अंत्यसंस्कार केले. विष्णूने हा सर्व अत्यंविधी ड्रेसिंग रुममधून व्हिडिओ कॉलवर पाहिला.
What a player . Has to be the toughest player i have known. A big salute to vishnu and his family by no means this is easy? wish you many more hundreds and alot of success ?? pic.twitter.com/i6u7PXfY4g
— Sheldon Jackson (@ShelJackson27) February 25, 2022
दहा दिवसापूर्वी नवजात बाळाचा मृत्यू
दहा दिवसांपूर्वी विष्णूच्या नवजात मुलीचा मृत्यू झाला. जन्मानंतर दुसऱ्याच दिवशी या नवजात बाळाचा मृत्यू झाला. मुलीच्या मृत्यूची दुर्देवी बातमी समजल्यानंतर विष्णू लगेच विमानाने अंत्यसंस्कारासाठी वडोदऱ्याला गेला. त्यानंतर तीन दिवसांनी सामना खेळण्यासाठी पुन्हा तो विमानाने भुवनेश्वरला परतला. विष्णू सोलंकीने चंदीगड विरुद्धच्या या सामन्यात 161 चेंडूत नाबाद 103 धावांची खेळी केली. त्याच्या शतकी खेळीत 12 चौकार होते.
ranji trophy vishnu solanki father passed away days after new born daughter death baroda cricketer