“क्रिकेट बदलेल पण साई दर्शनाचा..”; रवी शास्त्री काय म्हणाले?
रवी शास्त्री आणि उद्योजक गौतम सिंघानिया यांनी शिर्डीत साईबाबांचं दर्शन घेतलं. या दर्शनानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना साईंविषयीची श्रद्धा व्यक्त केली. मी क्रिकेट सामन्यांच्या निमित्ताने जगभरातील विविध देशांमध्ये फिरतो. त्या ठिकाणी मला मोठ्या संख्येने साईभक्त भेटतात, असं ते म्हणाले.

प्रसिद्ध उद्योगपती गौतम सिंघानिया आणि माजी क्रिकेटपटू रवी शास्त्री यांनी शिर्डीमध्ये एकत्रित साईबाबा समाधीचं दर्शन घेतलं. “क्रिकेटमध्ये अनेक बदल होतील, मात्र साईबाबांच्या दर्शनाचा आनंद कधीही बदलत नाही. मी जगभरात जिथे जातो तिथे साईभक्त भेटतात. हा बाबांचा महिमाच आहे,” असे गौरवोद्गार रवी शास्त्री यांनी काढले. उद्योगपती गौतम सिंघानिया आणि रवी शास्त्री हे दोघं निस्सीम साईभक्त आहेत. या दोघांनी शिर्डीच्या साई दरबारी हजेरी लावली. यावेळी साईबाबा संस्थानच्या वतीने शाल आणि साईबाबांची मूर्ती देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. तर शिर्डी ग्रामस्थांनी खास येवला पैठणीपासून बनवलेला फेटा बांधून मराठमोळ्या पद्धतीने दोघांचाही सत्कार केला.
“मी क्रिकेट सामन्यांच्या निमित्ताने जगभरातील विविध देशांमध्ये फिरतो. त्या ठिकाणी मला मोठ्या संख्येने साईभक्त भेटतात. साईबाबांचा महिमा जगभरात असून मलादेखील शिर्डीत येऊन दर्शन केल्यानंतर समाधान मिळतं. क्रिकेटमध्ये अनेक बदल होतील, खेळाडू बदलतील मात्र साई दर्शनाचा आनंद बदलणार नाही,” असं रवी शास्त्री यांनी म्हटलंय.
प्रसिद्ध उद्योगपती गौतम सिंघानिया यांनीसुद्धा साईदर्शनानंतर समाधान व्यक्त केलं. संस्थान कर्मचाऱ्यांच्या ड्रेसकोडसाठीचा रेमंड कंपनीच्या कापड खरेदीचा प्रस्ताव अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. देशातील प्रत्येकाला रेमंडचा कपडा हवाय. रेमंड हा देशाचा बँड असल्याचा आनंद होत असल्याचं सिंघानिया यांनी माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना म्हटलंय.




शिर्डीतील साईबाबा देवस्थान हे देशभरातील असंख्य भाविकांसाठी श्रद्धास्थान आहे. दररोज इथं लाखो भक्त साईंच्या दर्शनासाठी येतात. सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकजण साईंच्या चरणी नतमस्तक होतात. आयुष्यातील एखाद्या महत्त्वाच्या प्रसंगापूर्वीही भक्त याठिकाणी येऊन साईबाबांचा आशीर्वाद घेतात. काही दिवसांपूर्वी ‘छावा’ या चित्रपटातील कलाकार विकी कौशल आणि रश्मिका मंदानासुद्धा साईंच्या दर्शनासाठी शिर्डीला पोहोचले होते. त्यापूर्वी विकी कौशलची पत्नी कतरिना कैफ आणि आई शिर्डीला आले होते.