Ravindra Jadeja च्या बहिणीचे त्याच्या बायकोवर गंभीर आरोप
मैदानाबाहेर असलेल्या रवींद्र जाडेजाच्या कुटुंबातील कलह, अंतर्गत वाद-विवाद आले समोर
अहमदाबाद: टीम इंडियाचा प्रसिद्ध क्रिकेटपटू रवींद्र जाडेजाच्या कुटुंबातील वाद गुजरात विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने समोर आले आहेत. रवींद्र जाडेजाची बहिण आणि काँग्रेस प्रचारक नायनाबाने आपल्याच वहिनीवर आरोप केले आहेत. ही वहिनी म्हणजे रवींद्र जाडेजाची बायको रिवाबा जाडेजा आहे. ती भाजपाच्या तिकीटावर निवडणूक लढवत आहे.
रिवाबा निवडणूक प्रचारासाठी लहान मुलांचा वापर करतेय, असा नायनाबाकडून आरोप करण्यात आलाय. काँग्रेसने या विरोधात तक्रार नोंदवल्याच नायनाबाने सांगितलं.
बाल मजुरीचा आरोप
“सहानुभूती मिळवण्यासाठी रिवाबा लहान मुलांचा वापर करतेय. तुम्ही याला बाल मजूरही म्हणू शकता. काँग्रेसच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी या विरोधात निवडणूक आयोगाकडे रितसर तक्रार नोंदवली आहे” असं नायनाबाने पत्रकारांशी बोलताना सांगितलं.
नाव बदलायला 6 वर्षात वेळ नाही मिळाला
“रिवाबा राजकोट पश्चिमची मतदार आहे. मग, ती जामनगर उत्तरमधून निवडणूक लढवून मत कशी मागू शकते?” असा सवालही नायनाबाने विचारला. “निवडणूक फॉर्ममध्ये माझ्या वहिनीच खरं नाव रिवा सिंह हरदेव सिंह सोलंकी आहे. ब्रॅकेटमध्ये तिने रवींद्र जाडेजाच नाव ठेवलय. जाडेजा आडनाव वापरण्यासाठी म्हणून तिने हे केलय. तिच्या लग्नाला सहावर्ष झाली. पण नाव बदलायला तिला वेळ मिळाला नाही” अशी टीका नायनाबाने केली.
रिवाबा निवडणूक जिंकणार नाही?
जामनगर उत्तरची निवडणूक कौटुंबिक वादामुळे गाजत आहे. रिवाबा जाडेजा भाजपाच्या तिकीटवर निवडणूक लढवतेय. त्याचवेळी जामनगर उत्तरमध्ये जाडेजाची बहिण काँग्रेससाठी प्रचार करतेय. रिवाबाच्या विधानसभा निवडणुकीतील विजयाची शक्यता कमी आहे, असं नायनाबाने म्हटलं आहे.
रिवाबा सेलिब्रिटी आहे, जामनगरच्या लोकांना स्थानिक नेता हवा आहे, जो त्यांच काम करु शकेल असं नायनाबा म्हणाली. जामनगर उत्तरमध्ये 1 डिसेंबरला मतदान होईल. 10 नोव्हेंबरला भाजपाने येथून रिवाबाची उमेदवारी जाहीर केली.