Video : ऋषभ पंत आयपीएल 2024 स्पर्धेसाठी फिट अँड फाईन! भारतीय क्रिकेट संघासोबत केला सराव
अपघातातून ऋषभ पंत आता सावरला असून क्रिकेट मैदानात आता जुन्या अंदाजात दिसत आहे. गेल्या वर्षभरापासून क्रिकेटच्या मैदानातून दूर असलेल्या ऋषभ पंत आता खेळण्यासाठी सज्ज आहे. बंगळुरुमध्ये त्याने याची चुणूक दाखवून दिली. टीम इंडियासोबत नेट प्रॅक्टिस केली.
मुंबई : ऋषभ पंत..भारतीय क्रिकेटविश्वातील गाजणारं नाव..पण एका अपघाताने सर्व चित्र पालटून टाकलं. गेल्या वर्षभरापासून ऋषभ पंत क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. खऱ्या अर्थाने एका वर्षात क्रिकेट कारकिर्दितला सुवर्णकाळ ऋषभ पंतने गमावला. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप, वनडे वर्ल्डकप, आयपीएल 2023 या सारख्या मोठ्या स्पर्धांना मुकला. एक अपघात ऋषभ पंतला चांगलाच महागात पडला. आता दुखापतीतून सावरून पुन्हा पहिल्यासारखं ट्रॅकवर येण्याचं आव्हान आहे. ऋषभ पंतने जिद्दीच्या जोरावर मैदानात परतण्यासाठी पुन्हा एकदा जोरदार तयारी केली आहे. मंगळवारी टीम इंडियासोबत बंगळुरुच्या चिन्नास्वामी मैदानात दिसला. त्यामुळे ऋषभ पंत आता क्रिकेट खेळण्यासाठी सज्ज असल्याचं दिसून येत आहे. पंतने चिन्नास्वामी स्टेडियमधिये 20 मिनिटं फलंदाजीचा सराव केला. फिट अँड फाईन असल्याचं त्याने या माध्यमातून सांगितलं.
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात तिसरा टी20 सामना बंगळुरुत होणार आहे. या सामन्यापूर्वी टीम इंडिया सरावासाठी गेली होती. टीम इंडिया सरावासाठी येण्यापूर्वी ऋषभ पंत राष्ट्रीय क्रिकेट अकादमीतच्या स्टाफसोबत थ्रोडाऊनवर फलंदाजी करत होता. या सरावादरम्यान त्याने काही ऑफ साईड, तर काही ऑन साईड फटकेबाजी केली. त्यानंतर भारतीय संघाच्या साइड आर्म तज्ज्ञासोबत चर्चा केली. तसेच भारताच्या विराट कोहली, रिंकू सिंह आणि इतरांशी काही बाबी शेअर केल्या.
Virat Kohli With @RishabhPant17 During Practice Session In Bangalore Today. ❤️#ViratKohli #RishabhPant #INDvAFG @imVkohli pic.twitter.com/X4WDswBvPn
— virat_kohli_18_club (@KohliSensation) January 16, 2024
ऋषभ पंत याचं डिसेंबर 2022 मध्ये अपघात झाला होता. त्यानंतर शस्त्रक्रिया झाली आणि पुढील उपचारासाठी एनसीएमध्ये दाखल झाला. आता त्याच्यात बरीच सुधारणा झाली असून आयपीएल 2024 साठी सज्ज आहे. दिल्ली कॅपिटल्सने त्याच्याकडे कर्णधारपदाची धुरा सोपवली आहे. ऋषभ पंतचं भारतीय संघातील स्थान आता आयपीएल कामगिरीवर अवलंबून आहे.ऋषभ पंतचं टी20 वर्ल्डकपमध्ये खेळणं कठीण आहे. मात्र त्यानंतर होणाऱ्या मालिकेतून कमबॅकची शक्यता आहे.
ऋषभ पंतने 33 कसोटी सामन्यात 43.67 च्या सरासरीने 3085 धावा केल्या आहेत. तर 30 वनडे सान्यात 34.6 च्या सरासरीने 811, तर 66 टी20 सामन्यात 22.43 च्या सरासरीने 780 धावा केल्या आहेत. तर आयपीएल 98 सामन्यात त्याने 34.6 च्या सरासरीने 1981 धावा केल्या आहेत.