Rishabh Pant Health महत्वाची अपडेट, डॉक्टरांनी ऋषभला अजून हॉस्पिटलमध्ये का ठेवलंय?
Rishabh Pant Health : कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या ऋषभ पंतबद्दल महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. नुकतीच ऋषभ पंतच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाली.
Rishabh Pant Health : कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या ऋषभ पंतबद्दल महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. नुकतीच ऋषभ पंतच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाली. पंतच्या दोन लिगामेंट शस्त्रक्रिया झाल्या आहेत. पंतच्या बाकी लिगामेंट इंजरी आपोआप भरुन येतील अशी डॉक्टरांना अपेक्षा आहे. तेच पाहण्यासाठी डॉक्टरांनी पंतला अजून हॉस्पिटलमध्ये ठेवलय. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे. पंतला अजून दोन आठवडे रुग्णालयात काढावे लागतील. अजून 2 आठवड्यांनी पंतला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळेल. त्यानंतर त्याच्या रिहॅबचा प्लान तयार केला जाईल. पुढच्या 2 महिन्यात ऋषभ पंतच्या रिहॅबची प्रक्रिया सुरु होऊ शकते.
लिगामेंट बरे होण्यासाठी लागणार इतके आठवडे
“लिगामेंट बरे होण्यासाठी 4 ते 6 आठवड्याचा कालावधी लागतो. त्यानंतर पंतचा रिहॅब कार्यक्रम सुरु होईल. दोन महिन्यानंतर तो क्रिकेट खेळायला सुरुवात करु शकतो की, नाही, ते पाहिलं जाईल. ही एक अवघड प्रक्रिया आहे, पंतला त्याची कल्पना आहे. या दरम्यान त्याच काऊनसिलिंग होईल. त्याला क्रिकेट खेळण्यासाठी अजून 4 ते 6 महिने लागू शकतात” असं वृत्तामध्ये म्हटलं आहे.
पंतच्या कारचा भीषण अपघात
मागच्यावर्षी टीम इंडियाचा विकेटकीपर बॅट्समन ऋषभ पंतच्या कारला भीषण अपघात झाला होता. दिल्लीवरुन रुडकी येथे जात असताना हा भीषण अपघात झाला होता. अपघातानंतर ऋषभ पंतवर आधी डेहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये उपचार झाले. त्यानंतर त्याला मुंबईच्या कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्यात आलं. रुडकी येथे जात असताना कार डिवायडरला धडकून पलटी झाली. त्यानंतर कारने पेट घेतला. या भीषण अपघातातून ऋषभ पंत सुदैवाने बचावला. ऋषभच्या हाताला, डोक्याला, कमरेला आणि पोटाला मार लागला.
I am humbled and grateful for all the support and good wishes. I am glad to let you know that my surgery was a success. The road to recovery has begun and I am ready for the challenges ahead. Thank you to the @BCCI , @JayShah & government authorities for their incredible support.
— Rishabh Pant (@RishabhPant17) January 16, 2023
अपघातानंतर पंतच पहिलं टि्वट
“सपोर्ट आणि शुभेच्छाबद्दल मी तुमचा आभारी आहे. माझी सर्जरी यशस्वी झाली हे तुम्हाला सांगताना मला आनंद होतोय. रिकव्हरी सुरु झालीय. मी पुढच्या आव्हानांसाठी सज्ज आहे. बीसीसीआय, जय शाह आणि सरकारी अथॉरिटीचे आभार” असं ऋषभने त्याच्या टि्वटमध्ये म्हटलय. “मी मनापासून माझे चाहते, संघातील सहकारी, डॉक्टर आणि फिजियो यांचे आभार मानतो. तुमच्या शब्दांनी मला धीर दिला. माझी हिम्मत वाढवली. तुम्हा सर्वांना मैदानावर पाहण्यासाठी मी उत्सुक आहे” असं ऋषभने त्याच्या दुसऱ्या टि्वटमध्ये म्हटलय.