Retirment : विराट कोहली आणि रोहित शर्माची निवृत्ती, ऑलराउंडरसह ‘या’ खेळाडूंचाही समावेश
Retirement : रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांच्या निवृत्तीमुळे क्रिकेट चाहत्यांना फार वाईट वाटलं होतं. या दोघांनंतर रवींद्र जडेजा यानेही निवृत्तीचा निर्णय घेतला होता. जाणून घ्या.
नववर्षाला आणि 2024 हे वर्ष संपायला आता अवघे काही दिवस बाकी आहेत. या 2024 वर्षांत आतापर्यंत अनेक चांगल्या वाईट घटना घडल्या. विविध क्षेत्रात भारताने प्रगती केली. त्यानुसार क्रिकेट टीम इंडियासाठी 2024 हे वर्ष अविस्मरणीय आणि ऐतिहासिक ठरलं. टीम इंडियाने मायदेशात आणि परदेशातील विविध मालिकांमध्ये धमाकेदार कामगिरी केली. युवा ब्रिगेडनेही आपला ठसा उमटवला. अनेक खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं. भारतासाठी टी 20 वर्ल्ड कप जिंकणं ही 2024 या वर्षातील सर्वात मोठी अचिव्हमेंट ठरली. टीम इंडियाने रोहित शर्मा याच्या नेतृत्वात 11 वर्षांनी आयसीसी ट्रॉफीची प्रतिक्षा संपवली. तसेच 2007 नंतर टी 20I तर 2011 नंतर आयसीसी ट्रॉफी जिंकली.
टीम इंडियाला टी 20 वर्ल्ड कप विजयामुळे हे वर्ष कायमच लक्षात राहिलं. तसेच आणखी एका कारणासाठी हे वर्ष लक्षात राहिल. ते म्हणजे निवृत्ती. टीम इंडियाला टी 20 वर्ल्ड कप जिंकून दिल्यानंतर टीम इंडियाच्या तिघांनी झटपट निवृत्ती जाहीर केली होती. आजी माजी कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांनी टी 20I क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला. त्यानंतर काही तासांनी ऑलराउंडर रवींद्र जडेजा यानेही टी 20I क्रिकेटला अलविदा केला.
विराट, रोहित आणि रवींद्र या तिघांव्यतिरिक्त या वर्षभरात आतापर्यंत एकूण 7 जणांनी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. अनुभवी विकेटकीपर फलंदाज दिनेश कार्तिक याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला. टीम इंडियाचं 3 एकदिवसीय सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व करणाऱ्या सौरभ तिवारी याने तिन्ही प्रकारातून निवृत्ती जाहीर केली.
वरुण आरोन यानेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केला. वरुणने 9 कसोटी आणि 9 एकदिवस सामन्यांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं. बरींदर सरन याने ऑगस्टमध्ये तिन्ही प्रकारातून निवृत्त होत असल्याचं जाहीर केलं. बरींदर 6 वनडे आणि 2 टी 20I सामने खेळला.
अनुभवी विकेटकीपर फलंदाज ऋद्धीमान साहा याने नोव्हेंबरमध्ये निवृत्ती घेतली. साहाने 40 कसोटी आणि 9 एकदिवसीय सामने खेळले. ‘गब्बर’ शिखर धवन याने ऑगस्टमध्ये निवृत्ती जाहीर करत क्रिकेट चाहत्यांना झटका दिला. धवनने 34 कसोटी, 167 वनडे आणि 68 टी 20I सामन्यात भारताचं प्रतिनिधित्व केलं. तसेच काही सामन्यांमध्ये नेतृत्वाची धुरा सांभाळली.
पुणेकर केदार जाधव याने जून महिन्यात तिन्ही फॉर्मेटमधून रिटायरमेंट घेतली. केदार 73 एकदिवसीय आणि 9 टी 20 सामने खेळला. एकूण 10 खेळाडूंनी निवृत्ती घेतली. मात्र विराट आणि रोहितच्या निवृत्तीमुळे क्रिकेट चाहते सर्वाधिक हळहळले.