सनथ जयसूर्या चाचणी परीक्षेत पास, श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने घेतला मोठा निर्णय
श्रीलंकन क्रिकेट संघाची ढासळलेली स्थिती पाहून माजी क्रिकेटपटू सनथ जयसूर्या याची अंतरिम प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्याच्या कारकिर्दिची सुरुवातच टी20 मालिका पराभवाने झाली. मात्र त्यानंतर जबरदस्त कमबॅक केलं.

श्रीलंका क्रिकेट संघाची स्थिती गेल्या काही दिवसात नाजूक झाली होती. कोणीही यावं आणि हरवून जावं अशी स्थिती होती. त्यामुळे सर्वच स्तरातून श्रीलंका क्रिकेट संघावर टीका होत होती. यासाठी श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने वारंवार काही बदल केले. मात्र त्यालाही यश येताना दिसत नव्हतं. अखेर माजी क्रिकेटपटू सनथ जयसूर्या याला संघाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी रुजू केलं गेलं. त्याच्याकडे तात्पुरत्या स्वरुपात श्रीलंकन संघाची जबाबदारी दिली गेली. पहिल्याच मालिकेत श्रीलंकेला टी20 क्रिकेटमध्ये पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं. भारताने 3-0 व्हाईटवॉश दिला होता. त्यामुळे काही खास करता येणार नाही असंच वाटत होतं. पण त्यानंतर झालेल्या वनडे मालिकेत श्रीलंकेने भारताचा धुव्वा उडवला. दिग्गज खेळाडू असताना श्रीलंकन संघ भारतावर भारी पडला. तीन सामन्यांची वनडे मालिका श्रीलंकेने 2-0 ने जिंकली. त्यानंतर खऱ्या अर्थाने सनथ जयसूर्याचा प्रवास सुरु झाला.त्यानंतर इंग्लंड दौऱ्यात सुरुवातीचे सामने गमावल्यानंतर मालिकेतील एक कसोटी सामना जिंकत इतिहास रचला.
जयसूर्याच्या प्रशिक्षणाखाली श्रीलंकन क्रिकेट संघाने नुकत्याच मायदेशात झालेल्या कसोटी मालिकेत न्यूझीलंडविरुद्ध 2-0 असा क्लीन स्वीप दिला. जयसूर्याच्या आगमनानंतर श्रीलंकन संघाची कामगिरी स्थिर झाली आहे. खऱ्या अर्थाने श्रीलंकेचा सुवर्णकाळ परत असल्याचं जाणवलं. त्यामुळे सनथ जयसूर्यावर मोठी जबाबदारी टाकण्यात आली आहे. सनथ जयसूर्या आता पूर्णवेळ मुख्य प्रशिक्षक असणार आहे. श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने सनथ जयसूर्याला 1 ऑक्टोबर 2024 ते 31 मार्च 2026 पर्यंतचा कार्यकाळ दिला आहे. या कार्यकाळात श्रीलंकन संघाला फक्त एक आयसीसी चषक खेळता येणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचं गणित सुटेल की नाही याबाबत शंका आहे. दुसरीकडे, श्रीलंकन संघ चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी क्वॉलिफाय झालेला नाही. त्यामुळे आता थेट टी20 वर्ल्डकप 2026 जयसूर्याला मिळणार आहे.
Sri Lanka Cricket wishes to announce the appointment of Sanath Jayasuriya as the head coach of the national team.
The Executive Committee of Sri Lanka Cricket made this decision taking into consideration the team’s good performances in the recent tours against India, England,… pic.twitter.com/IkvAIJgqio
— Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) October 7, 2024
सनथ जयसूर्याची कारकिर्द
1991 ते 2007 या कालावधीत लंकेकडून खेळलेल्या सनथ जयसूर्याने या कालावधीत 110 कसोटी सामने खेळले आणि 40.07 च्या सरासरीने 14 शतके आणि 31 अर्धशतकांसह 6973 धावा केल्या. त्याने 445 एकदिवसीय सामन्यांमध्ये 32.36 च्या सरासरीने 28 शतके आणि 68 अर्धशतकांसह 13,430 धावा केल्या. 1996 च्या विश्वचषकात श्रीलंकेच्या विजयात जयसूर्याने महत्त्वाची भूमिका बजावली होती.