प्लॅनिंगप्रमाणे झालं नाही पण..; शुबमन गिलने शेअर केली गतवर्षाच्या संकल्पांची यादी
नवीन वर्ष आणि नवीन संकल्प हे जणू समीकरणच आहे. 2024 या नवीन वर्षाची सुरुवात झाली असून अनेकांनी विविध संकल्प करायला सुरुवात केली आहे. अशातच टीम इंडियाचा क्रिकेटर शुबमन गिल याने 2023 या वर्षातील संकल्पांची यादी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.
मुंबई : 1 जानेवारी, 2024 | नवीन वर्ष म्हटलं की अनेकांच्या हाती संकल्पांची यादी तयारच असते. नवीन वर्षांत कोणती स्वप्नं पूर्ण करायची, कोणत्या गोष्टीचा निर्धार करायचा किंवा कोणती चांगली सवय अंगीकारायची यासाठी अनेक संकल्प केले जातात. टीम इंडियाचा क्रिकेटपटू शुबमन गिल यानेसुद्धा 2023 या वर्षाच्या सुरुवातीला संकल्पांची यादी तयार केली होती. एका कागदावर त्याने स्वत:च्या हस्ताक्षरात हे संकल्प लिहिले होते. रविवारी 2023 या वर्षाच्या अखेरच्या दिवशी त्याने त्या यादीचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला. हे संपूर्ण वर्ष अनेक अनुभवांनी समृद्ध असल्याचंही त्याने म्हटलंय.
शुबमन गिलचे 2023 मधील संकल्प-
शुबमनने पोस्ट केलेल्या फोटोत त्याने लिहिलेल्या संकल्पांची यादी वाचायला मिळतेय. त्यात त्याने लिहिलंय, ‘भारतासाठी सर्वाधिक शतकं, कुटुंबाला खुश करणं, सर्वोत्तम प्रयत्न करणे आणि स्वत:शी थोडं नरमाईने वागणे, भारतासाठी वर्ल्ड कप जिंकणं आणि आयपीएल 2023 मध्ये ऑरेंज कॅप पटकावणं.’ गेल्या वर्षभरात शुबमनला हे सर्व संकल्प पूर्ण करायचे होते. हा फोटो पोस्ट करत त्याने सांगितलं की 2023 या वर्षांत बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या.
View this post on Instagram
‘बरोबर वर्षभरापूर्वी मी ही यादी लिहिली होती. आता 2023 हे वर्ष सरताना मी सांगू इच्छितो की संपूर्ण वर्ष माझ्यासाठी विविध अनुभवांनी, धमाल मस्तीने आणि शिकवणीने परिपूर्ण होतं. वर्षाचा शेवट ठरवलेल्या प्लॅनिंगप्रमाणे होऊ शकलं नाही, पण मी हे अभिमानाने सांगू शकतो की आम्ही आमच्या ध्येयाच्या खूप जवळ आलो आहोत. त्यासाठी आम्ही सर्वस्व पणाला लावलं आहे. नवीन वर्ष हे नव्या आव्हानांसोबत आणि संधींसोबत येणार आहे. 2024 या वर्षात आम्ही आमच्या ध्येयाच्या आणखी जवळ येऊ अशी अपेक्षा आहे. तुम्हाला तुमच्या आयुष्यात प्रेम, आनंद, ताकद हे सर्व मिळो’, अशा शब्दांत तो व्यक्त झाला. या पोस्टसोबतच त्याने 2023 या वर्षातील काही अविस्मरणीय क्षणांचे फोटो शेअर केले आहेत.
शुबमन गिलने 33 डावांमध्ये 47.34 च्या सरासरीने 1373 धावा केल्या आहेत. त्यात तीन शतकं आणि आठ अर्धशतकांचा समावेश आहे. गेल्या 17 सामन्यांत त्याने 59.33 च्या सरासरीने 890 धावा केल्या आहेत. यामध्ये तीन शतकं आणि चार अर्धशतकांचा समावेश आहे. यासह त्याला ऑरेंज कॅपचा विजेतादेखील घोषित करण्यात आलं आहे.