आरसीबीविरुद्धच्या विजयानंतर गिलची सोशल मीडिया पोस्ट चर्चेत, म्हणाला की…
आयपीएलच्या 14व्या सामन्यात गुजरात टायटन्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा 8 विकेट राखून पराभव केला. गुजरातने विजय मिळवल्यानंतर कर्णधार शुबमन गिलची सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत आली आहे. आता या पोस्टचा संदर्भ विराट कोहलीशी क्रीडाप्रेमी जोडत आहेत. नेमकं काय लिहिलं आहे ते जाणून घ्या.

गुजरात जायंट्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला त्यांच्याच होमग्राउंडवर पराभूत केलं आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी स्वीकारली. तसेच आरसीबीला 20 षटकात 169 धावांवर रोखलं. तसेच विजयासाठी दिलेलं आव्हान 17.5 षटकात 2 गडी गमवून पूर्ण केलं. या विजयानंतर गुजरात टायटन्सचा कर्णधार शुबमन गिलची सोशल मिडिया पोस्ट चर्चेत आहे. त्याने एक्स अकाउंटवर ही पोस्ट शेअर केली आहे. “आमचे लक्ष नेहमीच खेळावर असते…गोंगाटावर नाही,” असे त्याने कॅप्शन दिले. आता ही पोस्ट सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. गिलने आरसीबीचा माजी कर्णधार विराट कोहलीला उद्देशून पोस्ट केली असावी, असा अंदाज सोशल मीडियावर क्रीडाप्रेमी कमेंट्सच्या माध्यमातून वर्तवत आहेत. पण प्रश्न असा आहे की, गिल कोहलीला लक्ष्य करणारी पोस्ट का करेल? ते खरे आहे का? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
विराट कोहली प्रत्येक सामन्यात उत्साहीत असतो आणि संघ सहकाऱ्यांना प्रोत्साहन देत असतो. गुजरातविरुद्धच्या सामन्यात जेव्हा गिलची विकेट पडली तेव्हा विराटने त्याच्या संघातील सदस्यांसह आनंद साजरा केला. पण गुजरातने आरसीबीविरुद्ध 8 विकेट्सने सामना जिंकला. सामना जिंकल्यानंतर गुजरातचा कर्णधार शुबमन गिलने सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला ज्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले होते, “आमचे लक्ष नेहमीच खेळावर असते…गोंगाटावर नाही.” पहिल्या सामन्यात गुजरातचा पंजाबकडून पराभव झाल्यानंतर गिलच्या कर्णधारपदावर बरीच टीका झाली आहे. यासह, गुजरातने पुढील दोन सामन्यांमध्ये सलग विजय मिळवले.
Eyes on the game, not the noise. pic.twitter.com/5jCZzFLn8t
— Shubman Gill (@ShubmanGill) April 2, 2025
पंजाबविरुद्धच्या सामन्यानंतर गुजरातने मुंबई आणि आरसीबीविरुद्धचे दोन्ही सामने जिंकले. आयपीएल पॉइंट्स टेबलमध्ये सध्या चौथ्या स्थानावर आहेत. त्यामुळे काही जणांच्या मते गुजरातचा कर्णधार शुभमन गिलने त्याच्याविरुद्ध केलेल्या टीकेला प्रत्युत्तर म्हणून ही पोस्ट केली असावी. दरम्यान, मागच्या पर्वात गुजरात टायटन्स कामगिरी निराशाजनक राहिली होती. यंदाच्या पर्वात कशी कामगिरी करणार? याकडे लक्ष लागून आहे.