Team India | टीम इंडियाच्या खेळाडू विरुद्ध FIR, तरुणीकडून गंभीर आरोप
टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात 4 सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. या दरम्यान टीम इंडियाच्या खेळाडूवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई : टीम इंडिया ऑस्ट्रेलिया विरुद्ध बॉर्डर गावसकर ट्रॉफी खेळत आहे. टीम इंडिया या 4 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशा एकतर्फी फरकाने आघाडीवर आहे. तिसरा कसोटी सामना हा 1 ते 5 मार्च दरम्यान मध्यप्रदेशमधील होळकर स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. त्याआधी टीम इंडियाच्या खेळाडूच्या अडचणीत वाढ झाली आहे. टीम इंडियाच्या फलंदाजाविरोधात सोशल मीडिया इन्फ्लूएंसरने तक्रार दाखल केली आहे. या सोशल मीडिया इन्फ्लूएंसरने क्रिकेटपटूवर गंभीर आरोप लावले आहेत. या खेळाडूवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
टीम इंडियाचा पृथ्वी शॉ आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर सपना गिल या दोघांमध्ये सुरु असलेल्या वाद अजूनही संपलेला नाही. मुंबईतील न्यायालयाने पृथ्वीसोबत दुर्व्यवहार केल्याप्रकरणी आणि त्याच्या कारवर बेसबॉलच्या बॅटने तोडफोड केल्याने सपना गिल आणि 3 जणांना 10 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन दिला होता. जामीनावार बाहेर आल्यानंतर सपना गिल हीने पृथ्वीवर गुन्हा दाखल केला आहे.
सपना गिलकडून विनयभंगाचा आरोप
सपना गिल हीने पृथ्वी शॉ याच्यावर विनयभंगाचा आरोप केला आहे. पृथ्वीशिवाय आशिष यादव, ब्रिजेश आणि इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सपना गिल हीने आयपीसीच्या कलम 34, 120 बी, 144, 146, 148, 149, 323, 324, 351, 354 आणि 509 नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
हॉटेलबाहेर जोरदार राडा
व्हॅलेंटाईन डे निमित्त मुंबईसह संपूर्ण देशात प्रेमाच्या सणाचा उत्साह ओसंडून वाहत होता. तर दुसऱ्या बाजूला मुंबईतील सांताक्रूझमध्ये 14 फेब्रुवारी रोजी एका हॉटेलच्या बाहेर पृथ्वीसोबत कथितपणे मारहाण झाली. पृथ्वीच्या कारवर बेसबॉल बॅटने तोडफोड करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
सपना गिल आणि मित्र शोभित ठाकूर यांच्याशी पृथ्वीचा वाद झाला. या दोघांना पृथ्वीसोबत सेल्फी हवा होता. मात्र पृथ्वीने यांना आपल्यासोबत सेल्फी घेण्यास नकार दिला. त्यामुळे दोघांमध्ये वाद आणखी वाढला आणि वादाचं रुपांतर हाणामारीत झालं.
दरम्यान पृथ्वी शॉ टीम इंडियातून बाहेर आहे. पृथ्वीला वनडे आणि टेस्ट क्रिकेटमध्ये गेल्या 2 वर्षांपासून संधी मिळालेली नाही. तर पृथ्वीने 25 जुलै 2021 रोजी श्रीलंका विरुद्ध टी 20 पदार्पण केलं होतं. पृथ्वीला त्या सामन्यानंतर टीम इंडियाकडून प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळण्याची संधी मिळालेली नाही.
दरम्यानच्या काळात पृथ्वीने देशांतर्गत स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत आपली छाप सोडली. त्याने रणजी ट्रॉफीमध्ये त्रिशतक ठोकत सर्वांच लक्ष आपल्याकडे वेधलं.
पृथ्वीची न्यूझीलंड विरुद्धच्या टी 20 मालिकेत निवड करण्यात आली मात्र त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळण्याची संधी मात्र मिळालेली नाही.